म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:54+5:302021-05-21T04:07:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजाराच्या उपचाराकरिता व आवश्यक उपाययोजना करण्याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजाराच्या उपचाराकरिता व आवश्यक उपाययोजना करण्याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी ‘असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट ऑफ इंडिया’ विदर्भ शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे हे असून, एकूण १० सदस्यांचा समावेश आहे.
कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला समोरे जावे लागत आहे. अनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत आहे. या आजाराला आळा घालणे, गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे व्यवस्थापन व योग्य औषधोपचार तयार करणे, जिल्ह्यातील डॉक्टरांना मार्गदर्शन करणे, जनजागृती करणे आदी उपाययोजनांवर ही ‘टास्क फोर्स’काम करणार आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षस्थानी डॉ. निखाडे असून, सदस्य म्हणून डॉ. आशिष थूल, डॉ. गिरीश भुतडा, डॉ. रामक्रिष्ण शिनॉय, डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. मिलिंद भ्रुशुंदी, डॉ. विपीन देहाने, डॉ. मिलिंद चांगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. व्ही. पातुरकर व सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदींचा समावेश आहे.