नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला; संरक्षणमंत्र्यांकडून बडोद्याची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 08:00 AM2022-10-28T08:00:00+5:302022-10-28T08:00:02+5:30
Nagpur News वेदांता-फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारणारा संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे.
कमल शर्मा
नागपूर : वेदांता-फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारणारा संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातच्या बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी याचे भूमिपूजन करणार आहेत.
संरक्षण सचिव अजय कुमार यांनी गुरुवारी यासंबंधीची माहिती देताना सांगितले की, वायुसेनेसाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनविण्याची जबाबदारी टाटा एअरबसला सोपविण्यात आली आहे. कंपनी बडोदा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती करेल. या घोषणेमुळे महाराष्ट्रासह विशेषत: विदर्भ विकासाच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या विकासाला चालना मिळाली असती. मात्र याला आता ब्रेक लागला आहे. वेदांता-फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा हा दुसरा मोठा प्रकल्प आहे.
विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत देशपांडे म्हणाले, बडोद्यात असलेल्या पायाभूत सुविधांचा विचार करता टाटा समूहाने हा प्रकल्प तेथे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी टाटा एअरबसच्या प्रमुखांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपुरात सुरू करण्यास उत्सुकता दाखविली आहे. काय गेले याची चिंता सोडून आपल्याकडे जे आहे त्यावर अधिक विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र
- मिहानला टाटा समूहाचे बळ देण्यासाठी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल, असेही पत्रात नमूद केले होते. गडकरी यांनी टाटा समूहाशी असलेल्या आपल्या जुन्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.
महाविकास आघाडीने काहीच केले नाही : फडणवीस
- टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नव्हती. मात्र, आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
विदर्भाच्या अपेक्षांना धक्का : माहेश्वरी
विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले, हा प्रकल्प बडोद्यात गेल्याने नागपूरसह विदर्भाच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. हा प्रकल्प विदर्भासाठी भाग्यविधाता ठरला असता.
बडोद्यात साकारणाऱ्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- टाटा एअरबस बडोद्यातील प्लांटमध्ये पूर्णपणे स्वदेशी एअरक्राफ्ट तयार करेल. विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ पर्यंत केला जाईल.
- पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ दरम्यान येतील. यामुळे वायुसेना सी-२९५ परिवहन विमानांची सर्वात मोठी परिचालक बनेल. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- कुमार म्हणाले, सी-२९५ विमानांची निर्मिती पहिल्यांदाच युरोपच्या बाहेर होईल. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस डिफेन्स ॲण्ड स्पेससोबत सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. ज्यात भारतीय वायुसेनेच्या जुन्या एवरो-७४८ विमानांना बदलण्यासाठी ५६ सी-२९५ परिवहन विमानांची खरेदी करण्यात आली होती.
- करारानुसार एअरबस चार वर्षांत सेविले, स्पेनमध्ये आपल्या अंतिम असेंब्ली लाइनपासून फ्लाय-अवे स्थितीत पहिले १६ विमान देईल व यानंतर ४० विमाने भारतात टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स (टीएएसएल) द्वारा निर्मित व असेंबल केले जातील.