टाटा सुमो उलटली; नऊ जखमी
By admin | Published: August 3, 2016 02:47 AM2016-08-03T02:47:27+5:302016-08-03T02:47:27+5:30
वडिलांच्या अंत्यसंस्करासाठी चंद्रपूरहून भिवापूरला येताना चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव टाटा सुमो उलटली.
भिवापूर परिसरातील घटना : अंत्यसंस्काराला येताना झाला अपघात
भिवापूर : वडिलांच्या अंत्यसंस्करासाठी चंद्रपूरहून भिवापूरला येताना चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव टाटा सुमो उलटली. त्यात मुलासह अन्य आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना भिवापूरपासून पाच कि.मी. अंतरावरील भंडारा जिल्ह्यातील नीलज फाटा (ता. पवनी) परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
कमला शंकरराव तुपकर (६५), कविता विठ्ठल कामडी (४५), विठ्ठल फागोजी कांबळी (५०), मंदा शामराव बेले (५०), भाऊराव शामाजी बेले (५९) सर्व रा. चंद्रपूर, विकास गजानन शेंडे (१९, रा. ब्राह्मणी, जिल्हा भंडारा), सुरेश बिजाराम भुरे (४५), मंथन सुरेश भुरे (५), अमृत सुरेश भूरे (३) तिघेही रात्र चंद्रपूर अशी जखमींची नावे आहेत.
भिवापूर येथील बिजाराम भुरे (८६) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. सुरेश भुरे हा त्यांचा मुलगा असून, तो चंद्रपूरला राहतो. तो त्यांचे कुटुंबीय व काही नातेवाईकांना घेऊन वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी एमएच-३०/एल-६७४१ क्रमांकाच्या टाटा सुमोने चंद्रपूरहून भिवापूरला येत होते. ही सुमो त्यांनी किरायाने घेतली होती. दरम्यान, नीलज फाटा परिसरात चालकाचा ताबा सुटला आणि सुमो उलटली. त्यात नऊ जण जखमी झाले.
पवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
आधी वडिलांची भेट
या अपघातात सुरेश भुरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्याचा सल्ला भिवापूर येथील डॉक्टरांनी दिला. मात्र, सुरेश यांना उपचारापूर्वी वडिलांची शेवटची भेट घ्यावयाची होती. नागपूरला जाण्याचा तगादा वाढल्याने शेवटी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. त्यामुळे कुटुंबीयांचाही नाईलाज झाला. सुरेश यांनी जखमी अवस्थेत घर गाठले. वडिलांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर ते नागपूरच्या प्रवासाला निघाले. या घटनेमुळे नागरिकांनी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होत.