नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांना मिळणार आता टाटा ट्रस्टचे ‘बूस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:50 PM2017-12-11T20:50:21+5:302017-12-11T20:52:31+5:30
महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने गरजूंना उत्तम दर्जाचे उपचार मिळत नाही. परंतु आता मुंबई येथील टाटा ट्रस्ट महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचे बळकटी करून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने गरजूंना उत्तम दर्जाचे उपचार मिळत नाही. परंतु आता लवकरच गरजूंना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबई येथील टाटा ट्रस्ट महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचे बळकटी करून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणार आहे. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.
‘मोडल आॅफ युनिव्हर्सल प्रायमरी हेल्थ केअर इन नागपूर सिटी’ प्रकल्प महापालिका व टाटा ट्रस्ट संयुक्तपणे राबविणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत टाटा ट्रस्ट हा प्रकल्प राबविणार आहे.
टाटा ट्रस्टचा यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नाही. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च ट्रस्ट करणार आहे. यातून महापालिकेच्या २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण के ले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. याचा महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली.
प्रकल्पाच्या काही ठळक बाबी
- सदर प्रकल्प तीन वर्षांकरिता राबविण्यात येईल.
-महापालिका टाटा ट्रस्ट यांना कार्यालयीन कामाकरिता जागा, विद्युत व पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध क रून देईल.
- टाटा ट्रस्ट हे सदर रोगनिदान कें द्र येथे केंद्रीय प्रयोगशाळा स्थापन करतील. प्रयोगशाळेकरिता
लागणारे मनुष्यबळ व इतर आवश्यक बाबींकरिता लागणारा खर्च ट्रस्ट करतील.
-महापालिका नागरी आरोग्य केंद्राकरिता लागणारे मनुष्यबळ, औषधी उपलब्ध करून देईल
व दवाखान्याचे आवश्यक नूतनीकरण करेल.
- टाटा ट्रस्ट प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे शुल्क महापालिकेच्या दरानुसार आकारेल. तसेच
हे दर उपलब्ध नसल्यास राज्य शासनाच्या व केंद्र शासनाने ठरविलेल्या दरानुसार आकारण्यात येईल.
-प्रयोगशाळेत जमा होणारा निधी महापालिका व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये प्रत्येकी ५० टक्के विभागून
घेण्यात येईल.
-विभागून देण्यात आलेला निधीचा उपयोग टाटा ट्रस्ट प्रयोगशाळेकरिता
लागणाऱ्या घटकांवर खर्च करतील.