तावडे साहेब, बैठका सोडा... आधी किल्ल्यांवरील व्यावसायिक आक्रमण थोपवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:46 PM2019-07-22T23:46:20+5:302019-07-22T23:48:14+5:30

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला गडकोट किल्ल्यांवरील हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय राज्यातील दुर्गप्रेमींना रुचलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तावडे आणि रावल दोघेही पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याने, त्यांच्या कानापर्यंत अद्याप दुर्गप्रेमींचा आवाज पोहोचला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Tawade sir, leave meetings ... First stop the commercial invasion on the castles! | तावडे साहेब, बैठका सोडा... आधी किल्ल्यांवरील व्यावसायिक आक्रमण थोपवा!

तावडे साहेब, बैठका सोडा... आधी किल्ल्यांवरील व्यावसायिक आक्रमण थोपवा!

googlenewsNext
ठळक मुद्देकिल्ले संवर्धन समिती ‘हॉटेल’ निर्णयाबाबत आक्रमक पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला गडकोट किल्ल्यांवरील हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय राज्यातील दुर्गप्रेमींना रुचलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तावडे आणि रावल दोघेही पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याने, त्यांच्या कानापर्यंत अद्याप दुर्गप्रेमींचा आवाज पोहोचला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, सांस्कृतिक मंत्री तावडे यांच्याच अध्यक्षतेत स्थापन झालेल्या किल्ले संवर्धन समितीने पर्यटन मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, समितीच्या सदस्यांचा तावडेंसोबत संपर्क होत नसल्याने, सदस्यांचा तावडेंच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचेही दिसून येते. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या समितीमध्ये पूर्वी नऊ सदस्य होते. आता सदस्यांची संख्या १२ झाली आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथील तज्ज्ञांचा समावेश होतो. निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर यांच्यासारखे अभ्यासक या समितीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने लक्ष घालून, स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात करणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड हॉटेल व्यवसायासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून करण्यात आल्याने, समितीच्या सदस्यांचे माथे भडकले आहे. याबाबत शिवप्रेमी व दुर्गप्रेमी संघटनांनी थेट रावल यांच्याकडे विविध मार्गाने निर्णयाच्या निषेधाची निवेदनेही पाठविली आहेत. शिवाय, किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख म्हणून तावडे यांनाही ऐतिहासिक किल्ल्यांवर शासनाच्याच धोरणाद्वारे होत असलेले आक्रमण थोपविण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप दोन्ही मंत्र्यांकडून याबाबत कुठलीच प्रतिक्रिया उमटलेली नाही. किल्ले संवर्धन समितीच्या सदस्यांनी या निर्णयाविरोधात एकमताने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, तावडे आपल्या व्यस्ततेतून कधी मोकळे होतात, त्यावरच पुढची भूमिका निर्धारित होणार आहे.

पर्यटन मंत्र्यांनी रायगडावरील निवासव्यवस्था नीट करावी
 समितीने आपला निर्णय स्पष्ट केला असून, किल्ल्यांवर हॉटेल व्यवसायाच्या निर्णयाचा विरोध करण्याचे निश्चितच झाले आहे. लवकरच त्यांना समितीचे पत्र मिळेल, अशी माहिती किल्ले संवर्धन समितीचे नागपूरमधील तज्ज्ञ सदस्य प्रफुल्ल माटेगावकर यांनी दिली. पर्यटन मंत्र्यांनी गड-दुर्ग-किल्ल्यांवर पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी असले निर्णय घेण्यापेक्षा, रायगडावर पर्यटन विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या निवासव्यवस्थेची दुरुस्ती करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा टोला माटेगावकर यांनी मारला आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून या निवासाची दुरवस्था असून, छप्पर उडालेल्या अवस्थेत असल्याचे माटेगावकर यांनी सांगितले.

किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करू नका - दत्ता शिर्के
 शासनाचे एक खाते किल्ल्यांचे संवर्धन करण्यास पुढाकार घेते आणि दुसरे खाते, त्या संवर्धनावर माती फेरते, अशी विसंगती दिसून येत आहे. गड-दुर्ग-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे आणि पावित्र्य राखले जावे, यासाठी राज्यभरातील विविध स्वयंसेवक आणि संघटना स्वयंपे्ररणेने आणि स्व:खर्चाने झटत आहेत. असला निर्णय घेऊन पर्यटन विभागाने, किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न करू नये. अन्यथा, शिवप्रेमी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांनी दिला आहे.

Web Title: Tawade sir, leave meetings ... First stop the commercial invasion on the castles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.