अध्यक्षांच्या दणक्याने कर विभाग ताळ्यावर
By admin | Published: November 27, 2014 12:21 AM2014-11-27T00:21:42+5:302014-11-27T00:21:42+5:30
स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेताच कर विभाग ताळ्यावर आला आहे. आज. बुधवारी
लाखोंच्या मालमत्ता जप्त : दहाही झोनमध्ये कारवाई
नागपूर : स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेताच कर विभाग ताळ्यावर आला आहे. आज. बुधवारी दहाही झोन अंतर्गत कर थकीत असलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. याशिवाय लाखो रुपयांचा थकीत कर वसूल करण्यात आला.
बोरकर यांनी अत्यल्प कर वसुलीसाठी उपायुक्त संजय काकडे व कर आणि कर निर्धारक शशिकांत हस्तक यांना जबाबदार ठरविले होते. संबंधित दोन्ही अधिकारी पाच झोनच्या आढावा बैठकीला पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवत संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव महापौरांकडे सादर करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर आज कर विभाग एकाएकी सक्रिय झाला. विशेष म्हणजे दहाही झोनमध्ये कर थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत विद्याविकास विहार पब्लिक स्कूलकडे २ लाख ४१ हजार २८५ रुपये तर अरुण कलोडे विद्यालय खामला यांच्याकडे ४ लाख ८७ हजार ५४४ रुपये कर थकीत होता. त्यामुळे या दोन्ही शाळांवर जप्ती कारवाई करण्यात आली. धरमपेठ झोनने १५ जणांवर वॉरंट कारवाई करीत १५ लाख ३२ हजार रुपये कर वसूल केला. १४ घरमालकांवर जप्ती करण्यात आली.
हनुमाननगर झोनने कारवाई करीत ३५ लाख रुपये कर वसूल केला. नेहरूनगर झोनने जानकीनगर येथील अशोक भागवतकर यांच्याकडे २ लाख ३७ हजार रुपये व जुनी शुक्रवारी येथील नारायण वानखेडे यांच्याकडे २३ हजार रुपये कर थकीत असल्यामुळे जप्ती कारवाई केली. सतरंजीपुरा झोनने शहीम खान यांच्याकडे ५८ हजार कर थकीत असल्यामुळे वॉरंट कारवाई केली. लकडगंज झोनने वॉरंट कारवाई करीत २ लाख रुपये वसूल केले. आशीनगर झोनने शामराव कुंभारे व लक्ष्मीबाई भोटे यांच्याकडे जप्ती कारवाई केली. मंगळवारी झोनने वॉर्ड क्रमांक ५९ मधील रहिवासी चौरे यांच्यावर वॉरंट कारवाई करीत ३० हजार रुपये कर वसूल केला. (प्रतिनिधी)
कर भरा, जप्ती टाळा
नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला मालमत्ता कर झोन कार्यालयात जमा करावा व मालमत्तेची जप्ती टाळावी, असे आवाहन कर विभागातर्फे करण्यात आले आहे. वॉरंट कारवाई करून मालमत्ता जप्त केल्यानंतरही मुदतीत कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव करण्याचा इशारा कर विभागाने दिला आहे.