एसी तिकिटांवर जीएसटी क्रमांकासह टॅक्सची माहिती
By admin | Published: July 2, 2017 02:42 AM2017-07-02T02:42:06+5:302017-07-02T02:42:06+5:30
वस्तू व सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू झाल्यानंतर भारतीय रेल्वेने आपल्या एसी कोचच्या तिकिटांवर
तिकीट रद्द करताना आल्या तांत्रिक अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू झाल्यानंतर भारतीय रेल्वेने आपल्या एसी कोचच्या तिकिटांवर जीएसटीनुसार वसुली सुरू केली आहे. परंतु स्लिपर क्लासच्या तिकिटांवर जीएसटी आकारल्या जात नाही. यात १ जुलैपूर्वी खरेदी केलेले तिकीट रद्द करताना काही तास तांत्रिक अडचणी आल्या.
जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने एका प्रवाशाने नागपूर ते निजामुद्दीनपर्यंत खरेदी केलेल्या एसी ३ कोचच्या तिकिटांचा आढावा घेतला. दरम्यान, या तिकिटात काही नव्या बाबी आढळल्या. या तिकिटांच्या वरील भागात एसएसी आणि काही क्रमांक दिले होते. एसएसी म्हणजे सर्व्हिस अकाऊंट कोड. तिकिटात जीएसटीआयएन क्रमांकही देण्यात आला होता.
हे तिकीट डिपार्टमेंटच्या वतीने रेल्वेने जारी केल्याचा क्रमांक होता. त्यानंतर स्टेट आॅफ सप्लाय आणि त्यापुढे २७ महाराष्ट्र असे लिहिलेले होते. याचा अर्थ हे तिकीट कोणत्या राज्यातून आणि शहरातून जारी केले हे त्यावर नमूद होते. तिकिटाच्या सर्वात खालील भागात कापण्यात आलेला जीएसटी (एसजीएसटी आणि सीजीएसटी)ची विस्तृत माहिती होती.
या नव्या बदलाबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, एसी कोचच्या प्रवासात पूर्वी ४.५ टक्के सेवा कर लागत होता. त्याऐवजी आता ५ टक्के जीएसटी घेण्यात येत आहे. यामुळे एसीच्या प्रवासभाड्यात अधिक वाढ झालेली नाही. आज पहिल्याच दिवशी तिकीट रद्द करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्या.
मात्र मुंबई मुख्यालयात डाटाबेसमध्ये आवश्यक ते बदल करून या अडचणी लवकरच सोडविण्यात आल्या. तोपर्यंत प्रवाशांना संगणकाऐवजी मॅन्युअल कॅन्सल तिकीट जारी करण्यात आले. यामुळे प्रवाशांना कुठलीही असुविधा झाली नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी किती एसी तिकिटांची विक्री झाली, त्याची माहिती रविवारी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.