कर वसुली करा अन्यथा कारवाई : सभापतींचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:38 AM2019-03-08T00:38:49+5:302019-03-08T00:41:14+5:30
शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत सर्व झोनला दिलेले कर वसुलीचे ९० टक्के उद्दिष्ट ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करा, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी गुरुवारी समितीच्या आढावा बैठकीत दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत सर्व झोनला दिलेले कर वसुलीचे ९० टक्के उद्दिष्ट ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करा, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी गुरुवारी समितीच्या आढावा बैठकीत दिला.
यावेळी समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या अॅड. मीनाक्षी तेलगोटे, मंगला लांजेवार, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरीश राऊ त, स्मिता काळे, सुवर्णा दखणे यांच्यासह सर्व झोनचे कर अधीक्षक, सहायक कर निर्धारक उपस्थित होते.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने कर वसुलीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वारंवार निर्देश देण्यात आले. त्यानंतरही निर्धारित वेळेत उद्दिष्टानुसार कर वसुली करण्यात आलेली नाही. प्रत्येक झोनला थकबाकी मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार झोनमधील काही वॉर्ड थकबाकीमुक्त होत आहे. ही संख्या वाढविण्याची गरज आहे.
३१ मार्चपर्यंत सर्व झोनकडून ९० टक्के कर वसुली अपेक्षित आहे. त्यापेक्षा कमी कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यासाठी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यालाही जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा जाधव यांनी यावेळी दिला.
सायबरटेक कंपनी व मे. अनंत टेक्नॉलॉजी लि. यांच्या कामाचाही आढावा घेतला. कर वसुली संदर्भात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानसिकता बदलून जबाबदारीने काम करावे, प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवा, त्यांच्याशी संवाद साधा, कर भरण्यासाठी प्रवृत्त करा असे आवाहन जाधव यांनी केले.