टीबी रुग्णांचे पोषण लटकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:09 AM2021-08-13T04:09:24+5:302021-08-13T04:09:24+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : क्षयरोग म्हणजे टीबीच्या आजारातून बरे होण्यासाठी शरीराला आवश्यक पौष्टिक आहाराची गरज असते. यासाठी ‘निक्षय पोषण’ ...

TB patient nutrition hangs! | टीबी रुग्णांचे पोषण लटकले !

टीबी रुग्णांचे पोषण लटकले !

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : क्षयरोग म्हणजे टीबीच्या आजारातून बरे होण्यासाठी शरीराला आवश्यक पौष्टिक आहाराची गरज असते. यासाठी ‘निक्षय पोषण’ योजनेतून रुग्णाच्या खात्यात थेट दरमहा ५०० रुपये जमा होतात. परंतु, अनेक रुग्ण आपली ओळख लपवण्यिासाठी बँके खाते क्रमांकच देत नाही. जानेवारी ते जुलै या दरम्यान शहर आणि ग्रामीण मिळून ३९२५ नवे रुग्ण आढळून आले. यातील ५१ टक्के म्हणजे, २०१७ रुग्णांनीच खाते क्रमांक दिले. यामुळे टीबी रुग्णांचे पोषण लटकल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २००३ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर, एक्सडीआर रोगनिदानासह संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी-सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शिवाय, टीबीमुळे अशक्त झालेल्या रुग्णाचे पोषण होऊन त्याची मानसिक व शारीरिक क्रयशक्त वाढविण्यासाठी सरकारने ‘निक्षय पोषण’ योजना सुरू केली आहे. यात रुग्णांचा उपचार पूर्ण होईपर्यंत पोषण आहारासाठी ५०० रुपये आर्थिक मदत रुग्णाच्या खात्यात जमा केली जाते. परंतु, क्षयरोगाच्या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजात अद्यापही बदललेला नसल्याने अनेक जण आपली ओळख लपविण्यासाठी बँक खाते क्रमांक देत नसल्याचे वास्तव आहे. ज्यांच्याकडे खातेच नाही, त्यांना या योजनेचा लाभच मिळत नाही.

-शहरात खाते क्रमांक न देणाऱ्यांची संख्या अधिक

ग्रामीणच्या तुलनेत शहरातील अधिक रुग्ण आपली ओळख लपविण्यासाठी बँक खाते क्रमांक देत नसल्याचे पुढे आले आहे. ग्रामीणमध्ये जानेवारी ते जुलै या दरम्यान १०८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातील ८२ टक्के म्हणजे, ८९२ रुग्णांनी आपले बँक खाते क्रमांक दिले, तर शहरात खासगी आणि महानगरपालिकेकडे नोंद झालेल्या एकूण २८४१ पैकी ३९ टक्के म्हणजे ११२५ लोकांनीच आपले खाते क्रमांक दिले आहेत.

::जिल्ह्यातील क्षयरोगी - ३९२५

::भत्ता किती जणांना मिळतो - २०१७

:: न मिळणाऱ्यांचे प्रमाण -४९ टक्के

-टीबीची लक्षणे

अधिक किंवा कमी ताप, सतत खोकला, वजन कमी होणे, थुंकीतून रक्त येणे, छातीत दुखणे, वारंवार अतिसार, पोटात दुखणे, पोट फुगणे, नेहमी डोकेदुखी, मान दुखणे आणि ‘डबल व्हिजन’ ही टीबीची लक्षणे असू शकतात. शरीरावर कोणत्या भागात टीबी आहे यावरही लक्षणे अवलंबून असतात. केस आणि नखे वगळता शरीराच्या कोणत्याही भागात टीबी होऊ शकतो.

-ही आहे टीबीवरील उपचार प्रणाली

टीबीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चार अ‍ॅण्टिबायोटिक्स घ्यावी लागते. हा उपचार कमीत कमी सहा महिने चालतो. हाडे आणि सांध्याच्या टीबीसाठी एक वर्षापर्यंत औषधी घ्यावी लागू शकते. ‘एमडीआर-टीबी’च्या रुग्णांवर १८ ते २४ महिन्यांपर्यंत उपचार चालू शकतो.

कोट...

ग्रामीण भागात क्षयरोगाचे रुग्ण ओळखून त्यांना उपचाराखाली आणले जात आहे. ‘निक्षय पोषण’ आहाराचा फायदा देण्यासाठी त्यांच्या बँक खाते क्रमांक ‘निक्षय अ‍ॅप’शी जोडून त्यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे.

-डॉ. ममता सोनसरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी

कोट..

काही रुग्ण आपली ओळख लपविण्यासाठी, तर काही बँक खात्याच्या सुरक्षेसाठी खाते क्रमांक देत नाहीत. विशेषत: खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या अशा रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे खासगी डॉक्टरांकडेही आता खाते क्रमांक देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

-डॉ. शैलेजा जिचकार, क्षयरोग अधिकारी, मनपा

Web Title: TB patient nutrition hangs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.