नववी, दहावीच्या प्रवेशासाठी टीसीची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:54+5:302021-06-19T04:06:54+5:30
आशीष दुबे नागपूर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा ग्राफ कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विभागाने शाळांना निर्देश दिले ...
आशीष दुबे
नागपूर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा ग्राफ कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विभागाने शाळांना निर्देश दिले की, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी टीसीची गरज नाही. टीसी मिळत नसेल तर विद्यार्थ्यांना वयानुसार वर्गात प्रवेश द्यावा. वय ठरविण्यासाठी जन्मतारखेचा दाखला ग्राह्य धरावा.
विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाला दिली आहे. तसेच स्पष्ट केले की, कुठल्याही विद्यार्थ्याला टीसी नसल्या कारणाने शिक्षणापासून वंचित ठेवत असाल तर मुख्याध्यापकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. शिक्षण विभागाचे हे निर्देश सर्व शासकीय, मनपा, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळांना लागू राहणार आहेत. विभागाच्या या निर्णयाचा लाभ इतर राज्यातून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबियांच्या मुलांना होणार आहे. ही कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांचे शिक्षण प्रभावित होते. आरटीईच्या कायद्यानुसार आठव्या वर्गापर्यंतचे प्रवेश कुठल्याही शाळेत सहज होऊन जातात. परंतु नववी व दहावीच्या प्रवेशासाठी अडचण येते. परराज्यातून आलेल्या मुलांजवळ टीसी नसते. त्यामुळे शाळा त्यांचा प्रवेश करून घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ब्रेक लागतो. राज्याच्या शिक्षण मंडळाने अशा विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देता यावी म्हणून १७ नंबरच्या फॉर्मची व्यवस्था केली आहे. परंतु अशा विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे.