टीसीच्या सतर्कतेमुळे पळून चाललेला अल्पवयीन मुलगा सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 08:23 PM2023-03-03T20:23:47+5:302023-03-03T20:25:08+5:30
Nagpur News रागाच्या भरात घर सोडून पळून आलेला उत्तर प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगा तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे चाइल्ड लाइनच्या हाती लागला.
नागपूर : रागाच्या भरात घर सोडून पळून आलेला उत्तर प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगा तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे चाइल्ड लाइनच्या हाती लागला. त्याला सध्या येथील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले असून, त्याचे पालक येथे आल्यानंतर त्याला त्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
बिनू (वय १४, नाव काल्पनिक) हा मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होय. रागाच्या भरात तीन दिवसांपूर्वी त्याने घर सोडले. तो दिल्लीला आला आणि तेथील रेल्वे स्थानकावरून तो दिल्ली चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बसला. जनरल डब्यात टीसी अमोल अन्विकर हे तिकीट तपासणी करत असताना, गुरुवारी सकाळी बिनू त्यांच्या नजरेस पडला. विनातिकीट असल्यामुळे तो घाबरला. आपल्याला आता टीसी पोलिसांच्या हवाली करतील, याची कल्पना आल्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याची ती अवस्था ध्यानात आल्याने टीसी अन्विकर यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरवून घेतल्यानंतर त्याची आस्थेने विचारपूस केली. फलाट क्रमांक दोनवर त्याला खाऊपिऊ घातले. दरम्यान, चाइल्ड लाइनच्या सदस्यांच्या उपस्थितीत विचारपूस करण्यात आल्यानंतर बिनूने घरून पळून आल्याचे सांगितले. आपल्या पालकांचा पत्ता अन् संपर्क क्रमांकही सांगितला. त्यावरून चाइल्ड लाइनने रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बिनूच्या पालकांशी संपर्क साधला.
परिस्थितीमुळे त्यांना येण्यास दोन ते तीन दिवस विलंब होणार असल्याचे लक्षात आल्यामुळे बिनूला शासकीय बालगृहात ठेवण्यात आले. त्याचे पालक नागपुरात आल्यानंतर बिनूला त्यांच्या हवाली केले जाणार आहे. तिकीट तपासणीस अन्विकर यांच्या सतर्कतेमुळे बिनू पालकांपासून दूर जाण्यापासून बचावला. त्याचे भवितव्य अंधकारमय होण्यापासूनही बचावले.