निवडणूक आचारसंहीता असताना शिक्षक समायोजन; प्रक्रिया स्थगित करण्याची संघटनांची मागणी

By गणेश हुड | Published: October 21, 2023 03:26 PM2023-10-21T15:26:33+5:302023-10-21T15:27:13+5:30

१६ ऑक्टोबर पासून सबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहीता लागू

Teacher Adjustment During Election Code of Conduct; Organizations demand suspension of proceedings | निवडणूक आचारसंहीता असताना शिक्षक समायोजन; प्रक्रिया स्थगित करण्याची संघटनांची मागणी

निवडणूक आचारसंहीता असताना शिक्षक समायोजन; प्रक्रिया स्थगित करण्याची संघटनांची मागणी

नागपूर : कोणतीही निवडणूक आचारसंहिता लागू असताना कोणत्याही कर्मचा-यांच्या बदल्या करता येत नाही , परंतु जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असताना नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ३० ऑक्टोबरला शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया  निवडणूक आदर्श आचार असंहितेचा भंग करणारी असून सदर प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून होवू लागली आहे.

राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यात सुद्धा ५ नोव्हेंबर रोजी अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत, त्यामुळे १६ ऑक्टोबर पासून सबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहीता लागू झाली आहे. ती ७ नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे .

कोणत्याही निवडणूकीची आचारसंहीता सुरू असताना कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना बदलता येत नाही. शिवाय ज्या शासन निर्णयाचा संदर्भ देत जि.प.च्या शिक्षण विभागाकडून समायोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्याच शासन निर्णयात समायोजनकरताना कोणत्याही प्रकारे निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. असे असताना जि.प. प्रशासनाकडून कुठल्या आधारावर शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

समायोजन प्रक्रीयेत शिक्षकांच्या पदस्थापना बदलणार असून ते शिक्षक  निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या ग्राम पंचायत क्षेत्रातील सुद्धा असू शकतात अथवा त्यांनी ज्या गावाची निवड केली त्या गावात सुद्धा निवडणूक आचारसंहिता लागू असू शकते असे झाल्यास ही बाब निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरू शकते, त्यामुळे शिक्षक समायोजन प्रक्रिया  स्थगित करावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. ३० सप्टेंबर २०२३ उलटल्यानंतरही व मागील सत्रात बदली प्रक्रिया पार पडल्या नंतरही३० सप्टेंबर २०२२ च्या संच मान्यतेवर कुठल्या आधारे शिक्षक समायोजन केल्या जात आहे याबाबत शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

१९ ऑक्टोबर रोजी समायोजन प्रक्रीयेबाबत जि प. स्तरावरून  निर्गमित करण्यात आलेल्या पत्रात तारखांचा घोळ असून समायोजनाबाबतच्या वेळापत्रकात २०२२ व  २०२१ च्या तारखा दर्शविण्यात आलेल्या आहे ही बाब प्राथमिक शिक्षण विभागाचा गलथानपणा  कारभार दर्शविणारी आहे.

समायोजन प्रक्रिया स्थगित करावी

नागपूर जिल्ह्यात सध्या ग्राम पंचायत निवडणूक आचारसंहीता लागू असल्याने व समायोजन प्रक्रीयेबाबतच्या १२ मे २०११ च्या शासन निर्णयात तशी तरतुद असल्याने शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करण्थात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून करण्यात येत आहे.

- लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,नागपूर

Web Title: Teacher Adjustment During Election Code of Conduct; Organizations demand suspension of proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.