विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शिक्षिका जबाबदार नाही
By admin | Published: March 29, 2017 02:57 AM2017-03-29T02:57:44+5:302017-03-29T02:57:44+5:30
विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शिक्षिका जबाबदार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
हायकोर्टाचा निर्वाळा : एफआयआरमध्ये आवश्यक बाबींचा अभाव
नागपूर : विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शिक्षिका जबाबदार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
जयश्री सुनील कोटगीरवार (५१) असे शिक्षिकेचे नाव असून, त्या वर्धा येथील केसरीमल कन्या शाळेत कार्यरत आहेत. मयत विद्यार्थिनीचे नाव निकिता अंड्रसकर होते. ती गजानननगर येथे राहत होती. तिचे वडील वाल्मिक व्यवसायाने सुतार असून आई वायगाव येथील कॉटन मिलमध्ये मजुरी करते. निकिता इयत्ता दहावीत शिकत होती. शाळेतील एका मुलाने निकितावर मोबाईल चोरीचा आरोप करून यासंदर्भात कोटगीरवार यांच्याकडे तक्रार दिली होती. कोटगीरवार यांनी निकिताच्या आईला याची माहिती दिली. परिणामी निकिताने २९ जानेवारी २०१६ रोजी गळफास लावून आत्महत्या केली.
मोबाईल चोरीच्या आरोपामुळे आत्महत्या करीत असल्याचे तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
परिणामी निकिताच्या वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कोटगीरवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६(आत्महत्येस प्रवृत्त करणे)अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी कोटगीरवार यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी वरीलप्रमाणे निर्णय देऊन हा अर्ज मंजूर केला. कोटगीरवार यांच्यातर्फे अॅड. प्राजक्ता चौधरी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
म्हणून एफआयआर रद्द
निकितावर शाळेतील विद्यार्थ्याने आरोप केला होता. कोटगीरवार यांनी स्वत: तिच्यावर संशय घेतला नव्हता. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा एफआयआरमध्ये समावेश नाही. त्यामुळे कोटगीरवार यांच्याविरुद्ध खटला चालविणे निरर्थक ठरेल, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट करून एफआयआर रद्द केला.