शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:16 AM2017-11-07T00:16:41+5:302017-11-07T00:17:05+5:30
शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांची आॅनलाईन पगार बिलावरून जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षक समन्वय कृती समितीमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांची आॅनलाईन पगार बिलावरून जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षक समन्वय कृती समितीमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. शिक्षणाधिकाºयांनी पगार बिलाच्या संदर्भात निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयातच ठाण मांडले आहे.
मागील काही दिवसापासून शिक्षकांनी सर्व प्रकारच्या आँनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. त्यामध्ये शालार्थ पगार बिलाचासुद्धा समावेश आहे. त्याबाबत शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने ८ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया संकलित मूल्यमापन चाचणीवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी आंदोलनपूर्व सूचना ३० आॅक्टोबरलाच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली होती. परंतु त्याची दखल जि.प. प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे अजूनही हिंगणा, कामठी व उमरेड या तालुक्यांचे पगार बिल तयार करण्यात आले नाही. त्यामुळे सोमवारी या तीनही तालुक्यातील मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांच्या नावे लेखी निवेदन सादर करण्यासाठी आले होते; परंतु शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी कुणीही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी यांच्या कक्षासमोरच ठाण मांडले. सायंकाळी ७ पर्यंत कुणीही अधिकारी आले नाही. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी उपस्थित झाले. परंतु चर्चा न करताच निघून गेले. शेवटी या बाबीची माहिती शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना दिली. त्यांनी शिक्षक समन्वय समितीच्या अध्यक्षाशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली, परंतु तोडगा निघाला नाही. दुसºयांदा शिक्षणाधिकाºयांनी संपर्क करून बाजू ऐकून घेतली व तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाकडे बीओंचे दुर्लक्ष
आज केंद्रप्रमुखाकडून अनेक मुख्याध्यापकांनी संकलित चाचणीचे पेपर स्वीकारले नाही. तर दुसरीकडे पेपरची उचल करण्याबाबत प्रशासनाकडून मुख्याध्यापकांवर दडपण आणल्या जात आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबरपासून सुरू होणारी संकलित चाचणी होईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कामठी, हिंगणा व उमरेड पं.स.च्या गटशिक्षणाधिकांºयाच्या आडमुठ्या धोरणामुळे हा वाद विकोपाला पोहोचला असून शिक्षणाधिकारी यांचे आदेश मागील काही दिवसापासून गटशिक्षणाधिकारी धुडकावून लावत आहे.
तोडगा निघेपर्यंत
बहिष्कार कायम
जोपर्यंत पगारबीले पं.स.स्तरावरून काढण्याबाबत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत संकलित चाचणीवरचा बहिष्कार कायम राहील, असा इशारा जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी दिला आहे.