शिक्षकी पेशाला काळीमा, स्वच्छतागृहात महिलांचे व्हिडीओ बनविणारा वासनांध शिक्षक गजाआड
By योगेश पांडे | Published: January 30, 2024 10:46 PM2024-01-30T22:46:14+5:302024-01-30T22:46:48+5:30
खासदार औद्योगिक महोत्सवातील प्रकार : मोबाईलमध्ये आढळल्या दीड डझन क्लिपिंग्ज
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान स्वच्छतागृहात महिलांचे व्हिडीओ बनविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका शालेय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या मैदानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २९ जानेवारी रोजी सायंकाळी दोन महिला स्वच्छतागृहात गेल्या असता कुणीतरी खिडकीतून व्हिडीओ बनवत असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी बाहेर येऊन पोलिसांना ही माहिती दिली.
मात्र पोलिसांनी तेथे तपासणी केली असता काहीच आढळले नाही. हा प्रकार पोलिसांनी आयोजकांच्या कानावर टाकला. रात्री साडेसात वाजताच्या सुमारास परत एका महिलेने तशीच तक्रार केली. तिने त्याला पकडण्याचादेखील प्रयत्न केला होता. यानंतर आयोजकांनी सीसीटव्हीच्या माध्यमातून तपासणी केली असता मंगेश विनायक खापरे (३७, तीननल चौक, इतवारी) हा तेथून संशयास्पद स्थितीत जाताना दिसला. त्याला प्रवेशद्वाराजवळून ताब्यात घेतले. संतप्त लोकांनी त्याला चोपदेखील दिला. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात स्वच्छतागृहातील महिलांच्या क्लिपिंग्ज आढळल्या. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून मंगेशविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
- शिक्षक असूनदेखील किळसवाणा प्रकार
मंगेश हा एका खाजगी शाळेत कला शिक्षक आहे. खासदार औद्योगिक महोत्सवात देशविदेशातील उद्योजक आले होते. मुख्य प्रवेशद्वार सजविण्यासाठी त्याला बोलविण्यात आले होते. मात्र त्याने असा किळसवाणा प्रकार केला.
- २०२२ पासून सुरू आहे हा प्रकार
मंगेशने पहिल्यांदाच असा प्रकार केलेला नाही. त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना १८ ते २० मोबाईल क्लिपिंग्ज सापडल्या. त्यात २०२२ मधील मोबाईल क्लिपिंग्जचादेखील समावेश आहे. त्याने काही क्लिपिंग्ज डिलिट केल्या असून त्या रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली.