किती वेळा फोडून घ्यावे नाक? दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर कशाला? शिक्षकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:04 PM2021-07-17T12:04:57+5:302021-07-17T12:14:58+5:30

Nagpur News लसीकरणाचे दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणीला काय अर्थ आणि कितीदा चाचणी करताना आम्ही नाक फोडून घ्यावे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

Teacher question; How often should you blow your nose? Why RTPCR even after two doses? |  किती वेळा फोडून घ्यावे नाक? दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर कशाला? शिक्षकांचा सवाल

 किती वेळा फोडून घ्यावे नाक? दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर कशाला? शिक्षकांचा सवाल

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा गुरुवारी सुरू झाल्या. पण प्रशासनाने शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. लसीकरणाचे दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणीला काय अर्थ आणि कितीदा चाचणी करताना आम्ही नाक फोडून घ्यावे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने प्रशासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या. पण, त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक करण्यात आली. शिवाय शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, जागोजागी सूचनांचे फलक शाळांना लावण्यास सांगितले. त्यातच पुन्हा शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली. शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करायला लावली. त्यासंदर्भात शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की, ९९ टक्के शिक्षकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहे, तर पुन्हा आरटीपीसीआर कशासाठी?

      -पहिल्या दिवशी ९२ शाळाच होऊ शकल्या सुरू

जिल्ह्यात ८ ते १२ च्या ७५४ शाळा आहेत. परंतु, शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक आहेत. परंतु, जिल्ह्यातील ६९ शाळांनाच ग्रामपंचायतीने परवानगी दिली. मात्र, काही शाळांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून परवानगीची वाट न बघता स्वत:हून शाळा सुरू केली. अनेक शाळांना ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही. त्यामुळे १५ जुलैला ९२ शाळा सुरू होऊ शकल्या; पण विद्यार्थ्यांची संख्या १८३० एवढीच नोंदविण्यात आली.

- गेल्या वर्षभरात शिक्षकांनी किमान पाच ते सहा वेळा आरटीपीसीआर टेस्ट केल्या आहेत. त्याचे अहवाल आम्ही वारंवार विभागाला पाठविले आहे. त्या उपरही सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे. तरीही पुन्हा आरटीपीसीआरचा तगादा का लावला जातोय. आम्ही शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. सॅनिटायझेशनपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवत आहे. जागोजागी सूचना लावल्या आहेत. इतक्या प्रशासकीय प्रेशरमध्ये काम करणे अवघड होतेय.

राजश्री उखरे, प्राचार्य

- प्रत्येक वेळी आरटीपीसीआर शिक्षकांना करायला लावतात. मग लसीकरणाचा अर्थ काय. खरं तर शाळा सुरू करणे म्हणजे कसरतच आहे. पालकांचे संमतीपत्र गोळा करणे, शाळा व्यवस्थापन समिती बैठक घेणे, ग्रामपंचायतीची परवानगी घेणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, दररोज शाळा सुरू होताच फोन येतो, किती विद्यार्थी उपस्थित आहेत. वारंवार आढावे घेतले जातात. सूचना दिल्या जातात, माहिती मागितली जाते. हे सर्व करताना अध्यापन करणे अवघड जात आहे.

मिलिंद वानखेडे, मुख्याध्यापक

 शासनाचे निर्देश आहे

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाचे जे परिपत्रक आले आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही करतो आहे. त्यात आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी ते करावी, ही अपेक्षा आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Teacher question; How often should you blow your nose? Why RTPCR even after two doses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.