शिक्षक हा ‘अपग्रेड’ असावा!
By admin | Published: May 25, 2016 02:46 AM2016-05-25T02:46:29+5:302016-05-25T02:46:29+5:30
सीबीएसईच्या तुलनेत राज्य शिक्षण बोर्ड मागे का? हा नेहमीचा प्रश्न झाला आहे. शिवाय तेवढाच तो शिक्षकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
राज्य बोर्ड मागे का? : गणित शिक्षक परिषदेचा सवाल
नागपूर : सीबीएसईच्या तुलनेत राज्य शिक्षण बोर्ड मागे का? हा नेहमीचा प्रश्न झाला आहे. शिवाय तेवढाच तो शिक्षकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. राज्य बोर्डाचा जुनाट अभ्यासक्रम याला प्रमुख कारण ठरत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आज स्पर्धेचे युग आहे. यात प्रत्येकाला ‘अपग्रेड’ राहायचे आहे. मात्र यात राज्य बोर्ड मागे पडत आहे. त्यामुळे बोर्डाचा जुनाट अभ्यासक्रम बदलण्याची गरज आहे. शिवाय नवीन अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरला पाहिजे. सध्या त्या उलट परिस्थिती दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठ फिरविली आहे.
विद्यार्थी हा खासगी शिकविण्यांकडे धाव घेत आहे. यातूनच आज बोर्डाच्या अभ्यासक्रमासह शाळा व शिक्षकांनीसुद्धा स्वत:ला ‘अपगे्रड’ करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे परखड मत कनिष्ठ महाविद्यालय गणित शिक्षक कल्याण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ व्यासपीठच्या मंचावर व्यक्त केले.
या चर्चेत गणित शिक्षक परिषदेचे अध्यक्ष दीपक कडू, सचिव अरविंद जोशी, अतुल रोकडे, विजय तिडके, विजय पारधी, कल्पना भिसे, रंजना ढोबळे, सरिता मिर्झापुरे, विनायक भुजाडे यांनी भाग घेतला होता. ही संघटना मागील १९९५ मध्ये स्थापन झाली, असून, सध्या संघटनेची सदस्य संख्या ३५० पर्यंत पोहोचली आहे. शिवाय या संघटनेने अलीकडेच पाच विभागात कार्यकारिणी तयार केली आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या मते, कोणतीही शिक्षक संघटना म्हटली की, ती शिक्षकांच्या हक्कासाठी लढत असते. मात्र कनिष्ठ महाविद्यालय गणित शिक्षक कल्याण परिषद, ही शिक्षकांच्या हक्कांसोबतच विद्यार्थ्यांच्या हितासाठीसुद्धा काम करीत आहे. वास्तविक गणित विषय हा मुळातच विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणा असतो. त्यामुळे या विषयाची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे आवश्यक असते. शिवाय त्यात संशोधनसुद्धा झाले पाहिजे. यासाठी संघटना वर्षभर विविध उपक्रम राबवित असल्याचे यावेळी कडू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
परिषदेतर्फे विविध उपक्रम
कनिष्ठ महाविद्यालय गणित शिक्षक कल्याण परिषदेतर्फे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हक्कासोबतच वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यात संघटनेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट गणित शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. तसेच जीवन गौरव आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य पुरस्कारासह गणित विषयाच्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरवसुद्धा केला जातो.
अशी आहे, संघटना
४अध्यक्ष दीपक कडू, उपाध्यक्ष अरुणा शोभणे, सचिव अरविंद जोशी, कोषाध्यक्ष अतुल रोकडे, सहसचिव विजय तिडके, सदस्य डॉ. विनायक भुजाडे, सूर्यकांत भोंगाडे, प्रदीप उगेमुगे, भास्कर कोवाडे, अशोक पलांगडे, कल्पना भिसे, सरिता मिर्झापुरे, एल. सी. भंडारकर, विजय पारधी, व्ही. जी. भांबुरकर, डॉ. डी. के. बुरघाटे, ई. बी. धांदे व डॉ. बी. एन. वाफरे यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांवरील ताण वाढला
पूर्वी गणित विषयाचे दोन भाग करून, वेगवेगळे दोन पेपर घेतल्या जात होते. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने ते सोयीचे होते. परंतु २०१३ पासून दोन्ही भाग एकत्र करून, एकच पेपर तयार करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर या विषयाचा ताण वाढला आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी तो कंटाळवाणा ठरत आहे. याचा बोर्डाने विचार करून, पूर्वीप्रमाणे गणित विषयाचे दोन भाग करावे, अशी मागणी यावेळी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.
गणिताची गोडी
परिषदेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यात गणित प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, वैदिक गणित, भारतीय गणित, कार्यशाळा व गणित यात्रा अशा कार्यक्रमांचा समावेश असतो. या सर्व कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग असतो. या माध्यमातून गणित विषयाची विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करून, त्यांच्यात गोडी निर्माण करणे, हा मुख्य हेतू असतो, असे यावेळी परिषदेचे सचिव अरविंद जोशी यांनी सांगितले.
संघटनेच्या अशा आहेत मागण्या
१) गणिताच्या शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करावा.
२) प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णकालीन गणित विषयाच्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्या.
३) केंद्रीय मूल्यांकन पद्घती पुन्हा सुरू करण्यात यावी.
४) बोर्डाच्या अभ्यासक्रमात सुधारणा व्हावी.
५) व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात यावे.
६) सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून व्हाव्या.
७) उच्चशिक्षित शिक्षकांना एक अतिरिक्त वेतनवाढ मिळावी.