शिक्षकांच्या प्रशिक्षण संस्थेला प्राचार्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:40 AM2019-05-15T11:40:51+5:302019-05-15T11:41:12+5:30
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे. जि.प.चा १५०० च्या वर शाळांचा कारभार असलेल्या या संस्थेला प्राचार्य नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासोबतच शाळांना याबाबत मार्गदर्शन करून शंभरटक्के शाळा विद्यार्थी गुणवत्तापूर्ण प्रगत करण्यासाठी शासनाने दोन संस्थांची नेमणूक केली आहे. यामध्ये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे. जि.प.चा १५०० च्या वर शाळांचा कारभार असलेल्या या संस्थेला प्राचार्य नाही. त्यामुळे दोन्ही संस्था शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी उपयुक्त असे कार्य करीत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी दिवसें्दिवस शाळांची गुणवत्ता खालवत चालली आहे.
सदरच्या दोन्ही संस्थांमध्ये राज्य शासनाचे वर्ग-१ व वर्ग-२ या पदावरील अधिव्याख्याता कार्यरत आहेत. सदर अधिव्याख्यात्यांकडे जिल्ह्यातील जि.प.च्या शाळेची गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम राबविणे, शाळांना मार्गदर्शन करून शंभर टक्के शाळा विद्यार्थी गुणवत्तापूर्ण प्रगत करणे अशी महत्त्वाची कामे आहेत. जि.प.च्या १५३८ वर शाळांतील ८० हजारावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीची जबाबदारी या संस्थांतील अधिव्याख्यात्यांच्या खांद्यावर आहे. पण ते आपले अपेक्षित कर्तव्य बजावत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्याच समकक्ष असलेल्या एका अधिव्याख्याताकडे येथे प्राचार्य पदाचा कार्यभार आहे. अधिव्याख्याते स्वत:ची गुणवत्ता वाढविण्याकडे लक्ष देत असून सर्व ‘पीएचडी’ होत आहेत. अशातच अधिव्याख्यातांना काम असूनही काम दिसत नाही, म्हणून की काय शिक्षकांनाही या संस्थेत प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे. हे सर्व शिक्षक या अधिव्याख्यात्यांच्या सेवेत आहेत. ते त्या अधिव्याख्यात्यांनी सांगितलेली कामे करतात. अशाप्रकारे जिल्ह्यातील गुणवत्ता वाढविण्यासाठी असलेल्या यंत्रणेवर शासन कोट्यवधीचा खर्च करते.