मनपाच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केले मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:48 PM2019-03-01T23:48:18+5:302019-03-01T23:50:03+5:30
महापालिकेत कार्यरत कर्मचारी, शिक्षक, ऐवजदार, ठेका कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे. आंदोलन, उपोषण, निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मनपा प्रशासनाच्या विरोधात नाराजी प्रकट करण्यासाठी व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मनपाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत कार्यरत कर्मचारी, शिक्षक, ऐवजदार, ठेका कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे. आंदोलन, उपोषण, निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मनपा प्रशासनाच्या विरोधात नाराजी प्रकट करण्यासाठी व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मनपाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले.
नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. संघटनेची मागणी आहे की, सहाव्या वेतन आयोगाची ५९ महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना द्यावी. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या महागाई भत्त्याची ८४ महिन्यांची थकबाकी देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरित महापालिकेला लागू कराव्यात. कर्मचाऱ्यांची ४००० नवीन पदे निर्माण करून ऐवजदार सफाई कामगारांना मनपाच्या सेवेत स्थायी करावे, ठेकेदार कामगारांना लागू होणारे सर्व श्रमिक कायदे लागू करून २४० दिवस काम केलेल्या ठेका कामगारांना स्थायी करावे. मनपातील तांत्रिक श्रेणीतील कर्मचाऱ्यांची वेतन विसंगती दूर करावी. नागरी सेवांचे खासगीकरण बंद क रावे, मनपातील मंजूर रिक्त पदे त्वरित भरावी आदी मागण्या समितीतर्फे करण्यात आल्या आहेत. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, मुंडण आंदोलन करण्यात आले.