‘ऑफलाईन’ बदल्यांवर गुरुजी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 09:13 PM2020-07-17T21:13:44+5:302020-07-17T21:14:50+5:30
ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे यंदा १५ टक्के मर्यादा राखूनच बदल्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यात जि.प.चे ४ हजार ६०० वर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांच्या स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या बदल्या नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यामुळेच २०१८ पासून मंत्रायलस्तरावरुन ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यावर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे वित्त विभागाने बदल्यांना स्थगिती दिली होती. पण सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्याही बदल्या करण्याचा निर्णय घेतला. बदल्यांच्या धास्तीने शिक्षकांची धाकधूक वाढली होती. यात जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन व आंतरजिल्हा बदल्या या स्थानिक पातळीवरुनच ऑफलाईन होणार आहे.
नागपूर जिप मध्ये २०१९ मध्ये झालेल्या बदल्यांचे आदेश प्रलंबित आहेत. २०१८ च्या बदल्यांमध्ये रँडम व विस्थापित झालेल्या शिक्षकांबाबत शासन निर्णयाची नागपूर जिप मध्ये अंमलबजावणी नाही. वित्त विभागाने यंदा बदल्यांना स्थगिती दिली होती. राज्यातील एकाही संघटनेने ऑनलाईन बदलीला विरोध केला नसताना ऑफलाईन बदल्यांची शिफारस कुणी केली, असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, मनसे शिक्षक व शिक्षकेतर सेना
शिक्षण क्षेत्र गोंधळात असताना बदल्या का?
कोरोनामुळे अख्खे शिक्षण क्षेत्र गोंधळात आहे. शाळा सुरू होईल का नाही, याबाबत साशंकता आहे. गुरुजींच्या उपस्थितीबद्दल अजूनही प्रश्न सुटलेला नाही. हा संपूर्ण गोंधळ सुरू असताना, शासन गुरुजींच्या बदल्या करीत आहे. या बदल्यांच्या प्रक्रियेतही गोंधळ उडणार आहे. कारण ऑफलाईन बदल्यांसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो तर ऑनलाईनच्या निकषानुसार बदल्या केल्यास गोंधळ उडणार आहे.
परसराम गोंडाणे, मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना