नागपुरात पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी शिक्षक संघटना सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 08:54 PM2019-10-30T20:54:20+5:302019-10-30T20:56:34+5:30
शिक्षक संघटनांनी जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शिक्षक संघटना शिबिर लावून पदवीधरांची नोंदणी करवून घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीचे काम सुरू झाले आहे. यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीसंदर्भात पदवीधरांपर्यंत माहिती पोहचविण्यात जिल्हा प्रशासनाकडे पूरक यंत्रणा नसल्याने नोंदणीसाठी इच्छुक पदवीधरांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शिक्षक संघटना शिबिर लावून पदवीधरांची नोंदणी करवून घेत आहे.
भारतीय जनता पक्ष पूर्वीपासूनच पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवीत आला आहे. गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी यांनी पक्षाच्या मार्गदर्शनात पदवीधर निवडणूक लढविली आहे. सध्या पदवीधर मतदार संघातून प्रा. अनिल सोले हे आमदार आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबर राजकीय पक्षांकडूनही पदवीधर मतदार नोंदणीसाठी अभियान राबविण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदवीधर मतदार संघासाठी यावर्षी नव्याने मतदार याद्या तयार करणे सुरू झाले आहे. राजकीय पक्ष यासाठी नेटाने भिडले आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या मदतीसाठी शिक्षक संघटनाही सरसावल्या आहेत. शिक्षकांच्या संघटनांनी शिबिराच्या माध्यमातून पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करायचा आहे. नाव नोंदणीसाठी अर्ज क्रमांक १८ भरून द्यायचा आहे. मात्र जुन्या मतदार याद्या रद्द झाल्याने, आता सर्वच पदवीधरांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. परंतु यासंदर्भात आवश्यक माहिती जिल्हा प्रशासनाकडून पदवीधरांपर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरल्याने मतदार नोंदणीसह इच्छुक पदवीधरांपुढे पेच निर्माण झाला आहे. अर्ज कुठून प्राप्त करायचा, भरलेला अर्ज कुठे जमा करायचा, कुठले प्रमाणपत्र द्यायचे असे अनेक प्रश्न पदवीधरांसमोर निर्माण झाले होते. हे प्रश्न शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात सोडविले आहेत. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व संघर्ष वाहिनीने मतदार नोंदणीचा धडक कार्यक्रम राबविला आहे. दीनानाथ वाघमारे, मिलिंद वानखेडे, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, रविकांत गेडाम, पुष्पा बढिये यांच्या माध्यमातून मतदारांची नोंदणी सुरू झाली आहे.
तसेच फुले आंबेडकर टीचर्स असोसिएशननेसुद्धा पीडब्ल्यूएस कला वाणिज्य महाविद्यालय, टेका नाका, कामठी रोड येथे मतदान नोंदणीचे शिबिर सुरू केले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत जांभुळकर, सत्यवान साखरे, प्रकाश भोयर, रत्नदीप गणवीर, श्रीकांत झाडगावकर यांच्या माध्यमातून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शिक्षक हा सामान्य मतदार तर असतोच, पण तो पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातही मतदान करतो. मोठ्या प्रमाणात शिक्षक हा पदवीधर मतदार असतो. त्यामुळे शिक्षकांची नोंदणी हा मुख्य उद्देश आहेच, सोबतच शिक्षक ज्या महाविद्यालयामध्ये शिकवितो, तेथील पदवीधरांचीसुद्धा नोंद व्हावी, या भूमिकेतून मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. जास्तीत जास्त मतदारांची नोंद व्हावी, हा संघटनेचा उद्देश आहे.
डॉ. जयंत जांभुळकर, अध्यक्ष, फुले आंबेडकर टीचर्स असो.