नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी भागात शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:05 AM2018-07-14T01:05:16+5:302018-07-14T01:06:38+5:30
वर्गात गोंधळ घालण्याच्या कारणावरून शिक्षकाने सातव्या वर्गातील तब्बल १८ विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर लोखंडी स्केलपट्टीने मारहाण केली. त्यातील एका विद्यार्थ्याने याबाबत त्याच्या वडिलांना सांगितले. शाळा प्रशासन त्या शिक्षकावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने शेवटी प्रकरण पोलिसात पोहोचले. ही घटना बुटीबोरी परिसरातील ठाणा (पादरी) (ता. उमरेड) येथील डिवाईन्स प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्गात गोंधळ घालण्याच्या कारणावरून शिक्षकाने सातव्या वर्गातील तब्बल १८ विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर लोखंडी स्केलपट्टीने मारहाण केली. त्यातील एका विद्यार्थ्याने याबाबत त्याच्या वडिलांना सांगितले. शाळा प्रशासन त्या शिक्षकावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने शेवटी प्रकरण पोलिसात पोहोचले. ही घटना बुटीबोरी परिसरातील ठाणा (पादरी) (ता. उमरेड) येथील डिवाईन्स प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
पी. सब्सटेन असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. ता. ठाणा (पादरी) येथील प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये शिक्षकपदी कार्यरत आहे. त्याने गुरुवारी सकाळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावरील गवत काढायला लावले होते. सदर काम आटोपल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले. वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी मस्ती करायला सुरुवात केली. त्यातच पी. सब्सटेन वर्गात दाखल झाला. त्याने विद्यार्थ्यांना गोंधळ का घालता, अशी विचारणा करीत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
पी. सब्सटेन याने सातव्या वर्गातील तब्बल १८ विद्यार्थ्यांना त्यांच्या पार्श्वभागावर लोखंडी स्केलपट्टीने मारहाण केली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना बसणे अवघड झाले होते. यातील सुधांशू बाळकृष्ण ठाकरे (१२, रा. जुनीवस्ती, बुटीबोरी) याने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. बाळकृष्ण ठाकरे यांनी याबाबत शाळेत विचारणा केली. शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार गांभीर्याने न घेतल्याने शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सुधांशूची वैद्यकीय तपासणी करून शिक्षकाच्या विरोधात तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. त्याला शुक्रवारी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र, वृत्त लिहिस्तो सदर शिक्षक ठाण्यात हजर झाला नव्हता.
म्हणे ही ‘पनिशमेन्ट’ आहे
पी. सब्सटेन हा विद्यार्थी व विद्यार्थिनींना नेहमीच अशा प्रकारची मारहाण करतो. हा प्रकार पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास अनेकदा आणून दिला. मात्र, पी. सब्सटेन याला समज देऊनही त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. ही विद्यार्थ्यांना ‘पनिशमेन्ट’ असल्याचे शाळेमार्फत प्रत्येकवेळी पालकांना सांगण्यात आले. हा प्रकार मान्य नसल्याने पाल्यांना दुसºया शाळेत टाकण्याच्या सूचनाही शाळा व्यवस्थापनाने काही पालकांना दिल्या आहेत. या गंभीर प्रकाराबाबत शिक्षण विभाग संबंधित शाळेवर कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.