शिक्षकदिन विशेष; लिंबाचे झाड ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास जोशी सरांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:24 AM2019-09-05T11:24:26+5:302019-09-05T11:26:27+5:30

ती लिंबाखालची शाळा ते पुढे अमेरिकेपर्र्यंत झालेला शिक्षणाच्या प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून आशीर्वादाच्या रूपामध्ये जोशीसर सदैव सोबत राहिले, अशी भावना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केली.

Teachers' Day Special; From the citrus tree to the United States travel due to Joshi | शिक्षकदिन विशेष; लिंबाचे झाड ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास जोशी सरांमुळे

शिक्षकदिन विशेष; लिंबाचे झाड ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास जोशी सरांमुळे

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव म्हणतात, गुरूमुळे मिळाली करिअरची दिशा देशसेवेइतकेच पवित्र शिक्षकांचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सांगली जिल्ह्यातील कडेपूर या छोट्याशा गावी माझे बालपण गेले. खोडकर असल्याने शिक्षणाबद्दल फार रुची नव्हती. पण या वयात जोशीसरांसारखे गुरुजी मिळाले. जोशीसरांची शाळा एका लिंबाच्या झाडाखाली भरत होती. मी शाळेत नियमित आलो पाहिजे, अभ्यास केला पाहिजे म्हणून जोशीसर दररोज संत्र्याच्या गोळ्या मला द्यायचे. कधी खांद्यावर उचलून शाळेत घेऊन यायचे. जोशीसरांनी लावलेली माया, माझ्याबद्दलची त्यांची आपुलकीमुळे मला शिक्षणाची जाणीव झाली. पुढे अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, मुंबई असा शिक्षणाचा प्रवास झाला. प्रत्येक वळणावरही चांगलेच शिक्षक मिळाले, पण शिक्षणाचा खरा गंध हा जोशीसरांमुळेच लाभला. ती लिंबाखालची शाळा ते पुढे अमेरिकेपर्र्यंत झालेला शिक्षणाच्या प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून आशीर्वादाच्या रूपामध्ये जोशीसर सदैव सोबत राहिले, अशी भावना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केली.
पुढे यवतमाळच्या विवेकानंद हायस्कूलमध्ये फडणवीससरांचे सुद्धा संस्कार माझ्यावर झाले. त्यांनी मला शिस्त शिकविली. जशीजशी करिअरची दिशा गवसत गेली, तसतसे लाभलेले गुरू हे त्यांच्यापातळीवर उत्तमच होते. पण गुरूशिवाय आयुष्यात काहीच नाही. आयुष्याला महत्त्वाची दिशा देण्याचे कार्य हे केवळ गुरूमुळेच घडू शकते. गुरु ही अशी शक्ती आहे, जी प्रत्येक मुलांमध्ये असलेला कल लक्षात घेऊन त्याला त्याच्या प्रगतीच्या दिशेने मार्गस्त करते. आज पाच हजार शिक्षक माझ्यासोबत काम करतात. या शिक्षकांशी संवाद साधताना मी सदैव जोशीसरांचे उदाहरण देतो. कारण त्यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या प्रामाणिकतेमुळे आज आम्ही घडलो.

शिक्षक हा सेवाव्रती असायला पाहिजे
चांगले शिक्षक असणे ही काळाची गरज आहे. मूल्यवर्धनाचे खरे कार्य शिक्षकच करू शकतात. मला माझ्या आयुष्यात लाभलेले शिक्षक हे सेवा म्हणून कार्य करीत होते. मुळात शिक्षक हा सेवाव्रती आहे. तो देश आणि समाज घडविण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्याचे कार्य देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसारखेच पवित्र आहे. तन, मन, धन अर्पण करून शिक्षकांनी आपले कार्य केले पाहिजे. आज शिक्षकांपुढे अनेक अडचणी आहेत. पण शिक्षकांनी शिक्षणाचा घेतलेला वसा जोपासला पाहिजे.
आज पाच हजारावर शिक्षक माझ्यासोबत काम करतात. काही शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे सेवा देत आहे. दुर्गम भागात ज्ञानाचा मळा फुलवित आहे. त्यांनी भावी पिढी घडविण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांच्या करिअरला दिशा देण्यासाठी कर्तव्यरत असायला हवे. आज भरपूर प्रमाणात सोयी सुविधा पोहचल्या आहे. पूर्वीसारखे अध्यापनाचे काम अवघड राहिलेले नाही. फक्त शिक्षकांनी आपले ध्येय बाळगून कर्तव्य केल्यास चांगले अधिकारी, पुढारी या समाजातून घडू शकतात. हीच खरी शिक्षकांच्या सेवेची पावती ठरेल, असे मला वाटते.

शिक्षकांमुळेच नागपूर जिल्हा ठरतोय पायोनियर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ग्राफ थोडा घसरलेला होता. हा ग्राफ वाढविण्यासाठी आम्ही अध्ययन निश्चिती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यात शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहिले. प्रथम आणि असर संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती केली. त्यावर पुढे विशेष मेहनत घेतली. वर्षभरात त्याचे परिणाम दिसायला लागले. यात विभागीय आयुक्तांनी विशेष पुढाकार घेतला. हा कार्यक्रम यावर्षी संपूर्ण विभागात राबविण्यात येत आहे. शिक्षकांमुळे हा कार्यक्रम जिल्ह्यासाठी पायोनियर ठरतो आहे.

Web Title: Teachers' Day Special; From the citrus tree to the United States travel due to Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.