शिक्षक दिन विशेष; त्यांच्या धडपडीमुळे विद्यार्थी गिरवितात अभ्यासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 08:10 AM2020-09-05T08:10:21+5:302020-09-05T08:25:06+5:30

आलागोंदी हे गाव आदिवासीबहुल आहे. बोटावर मोजण्याइतक्याच लोकांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे. या गावात राजेंद्र रामहरी टेकाडे हे आलागोंदी जि.प. प्राथमिक शाळेत एकल शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत केवळ १२ विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी टेकाडे सरांनी पुरेपूर प्रयत्न केले.

Teacher's Day Special; Due to their efforts, students miss out on study lessons | शिक्षक दिन विशेष; त्यांच्या धडपडीमुळे विद्यार्थी गिरवितात अभ्यासाचे धडे

शिक्षक दिन विशेष; त्यांच्या धडपडीमुळे विद्यार्थी गिरवितात अभ्यासाचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देकठीण काळातही बजावले शिक्षकाचे कर्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसला आहे. सरकारी विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणाची प्रक्रियाच थांबली आहे. तर नामवंत खासगी शाळांमध्ये अजूनही शैक्षणिक शुल्काचा तिढा सुटलेला नाही. शासनानेही ऑनलाईन शिक्षण, दूरचित्रवाणीद्वारे शिक्षण, टिलिमिली, रेडिओसारख्या माध्यमातून शाळा बंद शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षकच समोर नसल्यामुळे काहीअंशी हा प्रयत्नही असफल राहिला. शासनाच्या वारंवार निघणाऱ्या दिशानिर्देशामुळे काही शिक्षक शाळेत गेले, उपस्थिती नोंदविली आणि घरी परतले. पण काही धडपड्या शिक्षकांमुळे, त्यांच्यातील कल्पकतेमुळे त्यांच्या अध्यापनाचे कार्य शाळा बंद असले तरी थांबले नाही.

- अभ्यासाला स्वाध्यायचा आधार
काटोल पं.स. अंतर्गत आलागोंदी प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ५ पर्यंत शिक्षण मिळते. आलागोंदी हे गाव आदिवासीबहुल आहे. बोटावर मोजण्या इतक्याच लोकांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे. या गावात राजेंद्र रामहरी टेकाडे हे आलागोंदी जि.प. प्राथमिक शाळेत एकल शिक्षक आहेत. दुर्दैवाने त्यांच्या शाळेत केवळ १२ विद्यार्थी आहे. पण या बारा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी राजेंद्र टेकाडे सरांनी पुरेपूर प्रयत्न केले. अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाची संधीच नव्हती. त्यामुळे त्यांनी गावातील ३ शिक्षक मित्र तयार केले. त्यांनी स्वत: विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या. या स्वाध्याय पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्या. शिक्षक मित्रांना अध्यापनाची पद्धत शिकविली. एका शिक्षक मित्राकडे चार विद्यार्थी सोपविले. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक मित्राच्या सवडीनुसार दररोज दोन तास वर्ग सुरू झाले. २६ जूनपासून त्यांनी अशाप्रकारची शाळा सुरू केली. आजपर्यंत त्यांचा ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. ते नियमित शिक्षक मित्रांच्या संपर्कात आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वाध्याय पुस्तिका स्वत: तपासतात. विशेष म्हणजे या शिक्षकांनी आपली मुलीचा प्रवेशसुद्धा त्यांच्या शाळेत घेतला आहे. या उपक्रमामुळे २६ जूनपासून त्यांच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही.

- टेक्नॉलॉजीचा केला वापर
नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड शाळेच्या विज्ञानाच्या शिक्षिका असलेल्या दीप्ती बिस्ट यांनीही शाळा बंद असली तरी अध्यापनाचे काम सातत्याने सुरू ठेवले.  मोबाईल असलेले आणि नसलेल्या विद्यार्थ्यांचा गट पाडला. मोबाईल असलेल्या विद्यार्थ्याला नसलेल्या विद्यार्थ्याची जबाबदारी दिली. बिस्ट यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून व्हॉट्सऑप, गुगल मीटद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवले. स्वत:चे व्हिडिओ तयार करून यू-ट्यूबवर टाकले. फेसबुक पेज तयार करून अभ्यासाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली. विज्ञानाच्या प्रयोगाचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना त्याचे प्रात्याक्षिक करावयाला लावले. शिवाय दररोज संपर्क करून मुलांना होमवर्क देणे, प्रश्नोत्तर विचारणे दररोज सुरू ठेवले. विशेष म्हणजे त्यांनी कुणाच्याही आदेशाची वाट बघितली नाही. स्वत:च्या घरीच ऑनलाईन वर्ग सुरू केला. तो आजतागायत सुरू आहे.

पालकांना समजाविले, माजी विद्यार्थ्यांची घेतली मदत
जिल्हा उच्च प्राथमिक शाळा, रुयाड, ता. कुही येथील शिक्षिका सारिका रामदास उके या पाचव्या वर्गाला शिकवितात. कोरोनामुळे १६ मार्चपासून त्यांची शाळा बंद झाली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षादेखील होत्या. अशात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे वर्ग घ्यायचे होते. शाळेत विद्यार्थ्यांना आणणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाईन अभ्यासाची माहिती दिली. काही माजी विद्यार्थी ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल होते, त्यांनाही विनंती केली आणि झुम अ­ॅपच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू केले. पुढे २६ जूनपासून शाळेचे सत्रही त्यांनी याच पद्धतीने सुरू केले. एक वेळ निश्चित केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना अध्यापन करू लागल्या. त्यांच्या वर्गात २५ विद्यार्थी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कळले नाही त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांचे समाधान करू लागल्या. त्यांच्या ऑनलाईन वर्गाला कोरोनाच्या काळात कधीही खंड पडला नाही. त्यांच्या या धडपडीमुळे ३० टक्के अभ्यासक्रम आतापर्यंत त्या पूर्ण करू शकल्या.

 

Web Title: Teacher's Day Special; Due to their efforts, students miss out on study lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.