शिक्षक दिन विशेष; जीवनातील प्रत्येक टप्प्यात शिक्षकांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:12 AM2019-09-05T11:12:24+5:302019-09-05T11:12:50+5:30
माझे आई-वडील. माझ्या जीवनातील सर्वात पहिले शिक्षक होत. त्यांच्यामुळेच आज मी सनदी अधिकारी होऊ शकलो. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात मला अनेक चांगले शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे मला खूप काही शिकता आले. संतोष त्यागी, ज्ञानसिंग कौरव, सुभाष जैन, विनय सिंग यासारख्या शिक्षकांनी केवळ शालेय अभ्यासक्रमच शिकवला नाही, तर हसतखेळत कसे शिकता येते, याचा परिपाठ घालून दिला. जीवनात नैतिक मूल्य आणि संस्कार दिले. शिस्त शिकवली. नैतिक मूल्य, संस्कार आणि या शिस्तीच्या भरवशावर आज मी उभा आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांचे माझ्या जीवनात अमूल्य असे योगदान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे आई-वडील. माझ्या जीवनातील सर्वात पहिले शिक्षक होत. त्यांच्यामुळेच आज मी सनदी अधिकारी होऊ शकलो. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्यात.
शिक्षकांचा मार आणि शिस्तीचा धडा
आम्ही तेव्हा नवव्या वर्गात शिकत होतो. त्या काळात शिक्षकांचा मार म्हणजे भयंकर असायचा. मीसुद्धा अनेकदा मार खाल्ला आहे. परंतु शिक्षकांचा तो मार मला संस्कारीत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. एकदा आमची सहल दुसऱ्या शहरात गेली होती. तेव्हा रात्री खूप उशीर झाला. सकाळी लवकर उठणे आवश्यक होते. परंतु कुणीही उठले नाही. तेव्हा माझे शिक्षक संतोष गौड हे आमच्यासोबत होते. ते सकाळी आमच्या खोलीत आले तेव्हा कुणीच उठले नसल्याचे पाहून त्यांनी आम्हा सर्वांना मारतच उठवले. त्यांनी आम्हाला मारले परंतु त्यांनाही फार वाईट वाटत होते.तेव्हा त्यांनी आम्हाला शालेय जीवनात शिस्त, वेळेचे महत्त्व समजावून सांगितले. आज तुम्ही वेळेवर उठले नाही, तर ही सवय होईल, आणि ती तुमच्या यशाच्या वाटेत बाधक ठरेल. ही बाब पटवून दिली. आम्ही लवकर उठू शकलो नाही, याचे आम्हालाही वाईट वाटत होते. त्यावेळी आम्हाला टाइम मॅनेजमेंट, अनुशासन हे समजले. दुसºया दिवशी आम्ही सर्व वेळेत उठलो. त्यावेळी त्यांनी दिलेला मार आजही मला अनुशासन आणि वेळेचे महत्त्व पटवून देत असतो.
आणि मी विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ लागलो !
अगोदर अभ्यास म्हणजे रट्टा मारणे असेच होते. आम्ही केवळ रट्टा मारायचो. आठव्या वर्गापर्यंत असेच चालले. परंतु नववीमध्ये संतोष त्यागी नावाचे शिक्षक आले. ते विज्ञान हा विषय अतिशय सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगायचे. त्यांच्यामुळेच मला विज्ञानासह इतर विषयाची गोडी निर्माण झाली. मी अधिक चांगल्या पद्धतीने विषय समजू लागलो. तसेच कौरव सरांचा नैतिक मूल्य यावर अधिक भर राहायचा. विनय सिंग यांनी मला यूपीएससीची तयारी करण्यात खूप मदत केली.
माझी आई सुषमा सोशियोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे. ती महिला बालविकास अधिकारी होती. नंतर तिने ती नोकरी सोडली. वडील डॉ. अशोक मुदगल हे बालरोगतज्ज्ञ आहेत. शाळेत शिक्षक शिकवत होतेच. परंतु माझ्या आईवडिलांचे माझ्या शिक्षणाकडे बारीक लक्ष असायचे. त्यातही माझी आई मी सनदी अधिकारी व्हावे, याकडे विशेष लक्ष देत होती. त्यासाठी ती अगोदरपासूनच त्यासंबंधीची पुस्तके मला आणून द्यायची. काय वाचायला हवे, कसा अभ्यास करायचा, हे ती सुरुवातीपासूनच सांगायची. तशी तयारीही माझ्याकडून करून घ्यायची. तिच्यामुळेच मी जिल्हाधिकारी होऊ शकलो.