शिक्षकांचा पदोन्नतीला नकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:22+5:302021-07-20T04:07:22+5:30
नागपूर : राज्यात पदोन्नतीसाठी आंदोलन सुरू आहे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येत आहे. असे असताना नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केंद्र ...
नागपूर : राज्यात पदोन्नतीसाठी आंदोलन सुरू आहे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येत आहे. असे असताना नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केंद्र प्रमुख म्हणून मिळणारी पदोन्नती नाकारली आहे.
जिल्हा परिषदेतील केंद्र प्रमुखांची १६ पदे पदोन्नतीने भरण्यात येणार होती. त्याकरिता सोमवारी समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व शिक्षण सभापती भारती पाटील उपस्थित होते. सेवाज्येष्ठता यादीनुसार ४९ शिक्षकांचा यात समावेश होता. भाषा विषयाच्या १८ शिक्षकांची नावे होती. त्यातून पाच जागा पदोन्नतीने केंद्र प्रमुखांच्या भरायच्या होत्या. यातून तीन शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारली. दोन जागा रिक्त राहिल्या. पण विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांमधून पाच जागा भरायच्या होत्या. त्यासाठी १३ शिक्षक पात्र होते. त्या पाचही भरण्यात आल्या. समाजशास्त्र विषय शिकविणाऱ्या १६ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र होते. पाच जागा त्यातून भरायच्या होत्या, पण दोन शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारली. तीन जागा रिक्त राहिल्या, तर दिव्यांगांमधून एका शिक्षकाला केंद्र प्रमुखपदी पदोन्नती देण्यात आली. शिक्षकांनी पदोन्नती नाकारल्याने पाच जागा रिक्त राहिल्या. केंद्र प्रमुख हे शिक्षकापेक्षा वरचे पद असतानाही स्वीकारण्यास नाकारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पण ज्यांनी पदोन्नती नाकारल्या, त्यांना पुढे दोन वर्ष पदोन्नतीचा लाभ घेता येणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.