शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:58+5:302021-06-10T04:06:58+5:30
नागपूर : कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना मृत्यू झालेल्या राज्यातील शिक्षकांची संख्या एप्रिलपर्यंत २१३ वर पोहोचली आहे. मात्र, ...
नागपूर : कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना मृत्यू झालेल्या राज्यातील शिक्षकांची संख्या एप्रिलपर्यंत २१३ वर पोहोचली आहे. मात्र, यापैकी एकाही मृत शिक्षकाच्या वारसांना ५० लाखांची अपेक्षित सानुग्रह मदत मिळाली नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
कोरोनासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासन देणार होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील रामदास काकडे यांचे १६ सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर राज्यातील पहिले प्रकरण विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. या प्रकरणात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय नागपूर यांनी मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, अद्यापही काकडे कुटुंबीयांना मदत मिळालीच नाही. राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या २१३ शिक्षकांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची संख्या ६० ते ७० च्या घरात तर प्राथमिक शिक्षकांची संख्या १३० आहे. कोरोनाची लागण झालेल्या कित्येक शिक्षकांना महागड्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. मृत्युपश्चात उपचाराचे लाखो रुपये चुकवण्याची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली.
- मदतीअभावी कुटुंबाची वाताहत
कमवता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आठ महिन्यांपासून प्रकरण मंजुरीअभावी पडून आहे. त्यातच निवृत्तिवेतनही मिळालेले नाही, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संगीता रामदास काकडे, पीडित
अशी प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत
- किरकोळ त्रुटींवर बोट ठेवून प्रस्ताव फेटाळला जाऊ नये. शासनाने पीडित कुटुंबाप्रति सहानुभूतीपूर्वक विचार करून अशी प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत.
मिलिंद वानखेडे, अध्यक्ष, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ