शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार अक्षम्य गुन्हा, हायकोर्टाचे मत, जामीन नाकारून दिला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:53 PM2017-09-28T21:53:34+5:302017-09-28T21:54:27+5:30
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे व नवराष्ट्र निर्माण करणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. शिक्षकी पेशाला समाजात आदराचे स्थान आहे. या पेशाला बदनाम करणा-यांना कठोरतेणे हाताळणे गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
नागपूर - विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे व नवराष्ट्र निर्माण करणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. शिक्षकी पेशाला समाजात आदराचे स्थान आहे. या पेशाला बदनाम करणा-यांना कठोरतेणे हाताळणे गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार अक्षम्य गुन्हा आहे असे मतही न्यायालयाने निर्णयात व्यक्त केले. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
अब्दुल मतीन अब्दुल वहाब (३९) असे शिक्षकाचे नाव असून तो कारंजा लाड, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी ९ वर्षे वयाची असून ती इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे. पोलीस तक्रारीतील माहितीनुसार, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पीडित विद्यार्थिनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून वडिलासोबत घरी गेली. वडिलाने विचारपुस केल्यानंतर तिने १८ फेब्रुवारी रोजी तिच्यासोबत आरोपीने केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराची माहिती दिली. आरोपीच्या भीतीमुळे तिने घटनेची माहिती कोणालाच दिली नव्हती. पोलीस तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही आरोपीला ददणका दिला. शासनातर्फे अॅड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.