शिक्षकांचा उन्हाळा कुटुंब सर्वेक्षणात
By Admin | Published: April 28, 2017 03:02 AM2017-04-28T03:02:03+5:302017-04-28T03:02:03+5:30
विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कामातून शिक्षक अद्यापही निवांत झालेला नसताना, त्याच्यावर कुटुंब सर्वेक्षणाचे काम शिक्षण विभागाने सोपविले आहे.
आदेश धडकला, टेन्शन वाढले : संघटनांचा आक्रमक पवित्रा
नागपूर : विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कामातून शिक्षक अद्यापही निवांत झालेला नसताना, त्याच्यावर कुटुंब सर्वेक्षणाचे काम शिक्षण विभागाने सोपविले आहे. १९ एप्रिलला शिक्षण विभागाने आदेश काढून सर्व अनुदानित शाळा, जि.प.च्या शाळा व महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविला आहे. हा आदेश धडकल्याने शिक्षकांचे टेन्शन वाढले आहे. अतिरिक्त ठरू नये म्हणून विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचे टेन्शन असताना, यात आता सर्वेक्षणाचे काम आल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाच्या या आदेशाविरोधात संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शासनाच्या कुठल्याही सार्वजनिक कामासाठी सर्वात पहिले टार्गेट म्हणजे शिक्षक. अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, अशी कितीही ओरड केली तरी, शिक्षकांच्या मागची कामे थांबता थांबत नाही. नुकत्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. शिक्षक सध्या पेपर तपासणी, निकाल लावण्याच्या कामात व्यस्त आहेत. निकालानंतर या शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी घरोघरी फिरायचे आहे. कारण अपेक्षित पटसंख्या नसेल, तर शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ येते. या शैक्षणिक कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाने कुटुंब सर्वेक्षणाचे काम दिले आहे. २१ एप्रिल ते ८ मे दरम्यान शिक्षकांना हे काम करायचे असल्याचे आदेशात नमूद आहे. एप्रिल महिना संपत आला असताना शिक्षकांना नेमके सर्वेक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिलेले नाही. हा काळ शिक्षकांसाठी निकालाचा असल्यामुळे शिक्षक त्यात व्यस्त आहेत. अशात विद्यार्थ्यांचे हित बघावे की, विभागाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा पेचात शिक्षक सापडले आहेत.(प्रतिनिधी)