नागपुरात नायलॉन मांजामुळे कापला शिक्षकाचा गळा; बचाव करताना बोटही चिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 08:57 PM2022-01-05T20:57:46+5:302022-01-05T22:38:16+5:30
Nagpur News बुधवारी सायंकाळी एका शिक्षकाचा गळा नायलॉन मांजामुळे कापला. खबरदारी घेतल्यामुळे शिक्षकाचा जीव वाचला. परंतु ते रक्तबंबाळ झाले.
नागपूर : नायलॉन मांजा दिवसेंदिवस घातक ठरत आहे. परंतु प्रशासन याविरुद्ध कारवाई करण्यासाठी अपयशी ठरत आहे. अशा स्थितीत वाहनचालक जीव धोक्यात घालून रस्ते, उड्डाणपुलावरून ये-जा करीत आहेत. बुधवारी सायंकाळी एका शिक्षकाचा गळा नायलॉन मांजामुळे कापला. खबरदारी घेतल्यामुळे शिक्षकाचा जीव वाचला. परंतु ते रक्तबंबाळ झाले. मांजामुळे त्यांच्या मानेला जखम होऊन एक बोट तुटले.
आशीनगर झोन येथील किदवाई स्कुलचे शिक्षक सगीर अहमद आपल्या दुचाकीने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता आझाद कॉलनी, ताजाबाद येथील आपल्या घरी परत येत होते. ताजाबाद मेन गेटसमोर उमरेड मार्गावर अचानक त्यांच्या समोर नायलॉन मांजा आला. दुचाकीचा वेग कमी असल्यामुळे त्यांना गळ््यात मांजा अडकल्याची जाणीव झाली. त्यांनी खबरदारी घेऊन हाताने मांजा पकडला आणि तो आरशात अडकविला. परंतु तोपर्यंत मांजामुळे त्यांची मान रक्तबंबाळ झाली होती. त्यांच्या डाव्या हाताचे बोट जखमी झाले.
आजुबाजुचे नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी पंचवटी येथील एका खासगी रुग्णालयात पोहोचविले. सुत्रांनुसार आजुबाजुला मोठ्या प्रमाणात मांजा विकण्यात येत आहे. ताजाबाद परिसरात मांजी लपुन विक्री होत आहे. परंतु प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. प्रशासन केवळ बाजारात कारवाई करीत आहे. वस्त्यात नायलॉन मांजा विकणारे सक्रिय झाले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
....................