शिक्षण : डिजिटली की फिजिकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:36 AM2020-06-16T10:36:12+5:302020-06-16T10:36:39+5:30
सर सलामत, तो पगडी पचास आणि जान है तो जहान है याची आठवण खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला करुन दिली आहे.
नागपूर:
आतापर्यंत आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करीत होतो. आता मात्र आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणासह सुरक्षित शिक्षणाचा विचार करावा लागणार आहे. सुरक्षित शिक्षण ही आजच्या काळाची नवी गरज ओळखून त्याप्रमाणे आवश्यक ती पावले उचलणे सर्वांना क्रमप्राप्त झाले आहे. या कोरोना काळात आरोग्य आणि जीवन हे इतर सर्व बाबींपेक्षा प्राधान्याचे विषय झाले आहेत. सर सलामत, तो पगडी पचास आणि जान है तो जहान है याची आठवण खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला करुन दिली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सुरक्षित शिक्षण कसं मिळेल, याचा प्राधान्याने पालक विचार करु लागले आहेत तर मुलांना शिक्षणासोबत सुरक्षित कसे ठेवता येईल, याचा विचार शाळा, प्रशासन आणि सरकार करु लागले आहे. येणारं शैक्षणिक सत्र हे डिजिटली आणि फिजिकली शिकण्याचं आणि शिकवण्याचं असेल. शासन, शिक्षक आणि एकूणच शिक्षण व्यवस्था उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक साधनाचा वापर करुन मुलांपर्यंत शिक्षण घेऊन पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तो मोबाईल असो, टीव्ही असो की शाळेतला फळा.
खरं तर जून महिन्याच्या पहिल्या, दुसºया आठवड्यात शाळा सुरु होतात. त्यासाठीची लगबग मुलांमध्ये, पालकांमध्ये आज कुठेही दिसत नाही. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा मोठे शानदार प्रवेशोत्सव साजरा करायच्या. यावर्षी त्या आनंदाला मुकावे लागणार आहे. कोरोनारुपी संकटामुळे इतर काही अप्रिय तर काही दिलासादायक बदल आपल्याला शाळा आणि शिक्षणात पाहायला मिळतील. हे सर्व बदल आपल्याला पचवून मुलांना शिकण्याचा आनंद द्यायचा आहे. शेवटी आपण हे सारं मुलांच्या आनंदासाठीच तर करतोय.
पूर्वी घंटी वाजली की शाळा सुरु झाली असे समजून मुले शाळेत जमायची. आता मात्र घंटी वाजली तरी मुले शाळेत येतीलच हे सांगता येत नाही. शाळा सुरु झाल्या झाल्या सर्वच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतीलच असे नाही. पालक साशंक आहेत. मुलांची सुरक्षितता हे त्यांच्या काळजीचे कारण आहे. त्यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांना पालकांच्या भेटी घ्याव्या लागतील. त्यांना मुलांच्या सुरक्षिततेचा विश्वास द्यावा लागेल. पालकांचे व मुलांचेही शिक्षकांना समुपदेशन करावे लागेल. शाळांमध्ये असणाºया सोयी-सुविधांबाबत त्यांना आश्वस्त करावे लागेल. या प्रयत्नांनंतरच पालक मुलांना शाळेत धाडतील.
कोरोनापासून आपण किती काळ दूर पळणार आहोत? आता कोरोनासोबत आपण जगायला शिकलं पाहिजे, असा सल्ला भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संस्थांनी भारतासह जगातील नागरिकांना दिला आहे. तेव्हा कोरोनासोबत लढतानाच आपण जगायला शिकलं पाहिजे. लॉकडाऊन हा सार्वकालिक उपाय नाही. जगण्याचं चाक फिरतं ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं ठेवणंही तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे बंद पडलेले व्यवहार आणि साचलेलं जीवन गतिमान करणं आवश्यक आहे. शिक्षणही थांबल्याचं अनेकांना वाटतं. त्यामुळे काळाची गरज ओळखून योग्य ती दक्षता घेत शाळा सुरु करण्याचा निर्णय झाल्यास तो पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी पूरक आणि पोषक ठरेल.
शाळा पूर्वतयारी
कोरोना काळात शाळा सुरु करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी शाळांना घ्यावी लागणार आहे. शालेय परिसर आणि वर्गखोल्यांची स्वच्छता त्याचप्रमाणे आरोग्यविषयक सोयीसुविधांचा आढावा शाळांना घ्यावा लागेल. विशेषत: हात धुण्याची जागा मुलांना उपलब्ध करुन द्यावी लागेल. सर्व शिक्षा अभियानातून काही मोजक्या शाळांमध्ये हॅण्डवॉश स्टेशन उभारण्यात आले आहेत; मात्र बहुतांश शाळांमध्ये हात धुण्याची जागा नाही किंवा ती निश्चित केलेली नाही. अनेक शाळांमध्ये तर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न आहे. तिथे हात धुण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध करुन देणार? सोबतच लिक्विड सोप, सॅनिटायझर, मास्क, थर्मल गन, निजंर्तुकीकरणासाठी आवश्यक साहित्य व रसायनं, बसण्यासाठी जास्तीची बाकडे अशा अनेक सुविधा शाळांना आपल्यास्तरावर कराव्या लागतील. शाळांचे निजंर्तुकीकरण करुन घेणे, शाळा धुऊन घेणे ही कामेही करावी लागतील. स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि त्यांची स्वच्छता त्यासाठी लागणारं साहित्य, पाणी उपलब्ध असावे लागेल. या सर्वांसाठी शाळांना जास्तीच्या अनुदानाचीही गरज भासेल. ग्रामपंचायत, नगरपालिका यांना अशा सुविधा शाळेत उपलब्ध करुन द्याव्या लागतील.
नवे बदल
शाळांमध्ये योग्यप्रकारे शारीरिक अंतर राखले जावे यासाठी शाळेच्या वेळापत्रकात काही नवे बदल शाळांना करावे लागतील. शिक्षक आणि पालकांना हे नवे बदल स्वीकारावेही लागतील. जसे सकाळ आणि दुपार पाळीतील शाळा. ज्या शाळा आतापर्यंत केवळ एकाच पाळीत चालायच्या त्यांना दोन पाळ्यात चालवावे लागेल. त्यामुळे एकाच वेळी होणारी गर्दी टाळता येऊन शारीरिक अंतर राखण्यात मोठी मदत मिळेल. ज्या शाळा आतापर्यंत दोन पाळीत चालायच्या त्या आता एक दिवसाआड चालवाव्या लागतील. यात सकाळ आणि दुपार अशा दोन्ही पाळीत सम आणि विषम गटात मुलांचे वर्गीकरण करुन सम तारखेला सम हजेरी क्रमांकाची मुले तर विषम तारखेला विषम हजेरी क्रमांकाची मुले शाळेत हजर असतील. शारीरिक अंतर योग्य पद्धतीने राखता यावे म्हणून मुलांच्या संख्येनुरुप जास्तीच्या वर्गखोल्या उपलब्ध करुन द्याव्या लागतील. मुलांची गर्दी होणारे प्रार्थना, परिपाठासारखे काही उपक्रम पुढील काही दिवसांसाठी थांबवावे लागतील. लघुशंका, लंच ब्रेक आणि शेवटच्या सुटीच्या वेळी शाळेतील सर्व वर्ग एकदाच न सोडता या सुट्यांमध्येही थोडे अंतर ठेवावे लागेल. शनिवार हा अर्ध सुटीचा दिवस. कमी झालेल्या तासिकांची भरपाई करण्यासाठी शनिवार आणि काही टाळता येण्यासारख्या सुट्यांच्या दिवशी शाळा चालवावी लागेल.
वेळापत्रक आणि अभ्यासक्रमातील बदल
शाळा दोन पाळीत भरवली गेल्यास शाळांच्या वेळांमध्ये काही कपात करावी लागेल. पूर्वीएवढी साडेसहा तास किंवा पूर्ण आठ तासिका शाळा चालणार नाही तर त्यापेक्षा कमी वेळ शाळेत अध्यापन होईल. कमी झालेल्या तासिकांचा परिणाम म्हणून भाषा, गणित, विज्ञान हेच विषय शिकविले जातील.
इतर विषयांना एकतर तासिकाच मिळणार नाही किंवा मिळाल्या तरी त्या अत्यल्प असतील! त्यामुळे अभ्यासक्रमात काही प्रमाणात कपात करावी लागेल. अध्ययन पद्धतीत शिक्षकांना बदल करावे लागतील. कमी वेळात मुले जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळवतील यावर भर द्यावा लागेल. अशा नव्या पद्धतीने मुलांना शिकवावे लागेल. गट अध्यापनासारख्या पद्धती थांबवून त्याऐवजी मुलांचे स्वयंअध्ययन वाढवावे लागेल.
दिवसाआड असणाºया शाळांमध्ये मुलांना अधिकाधिक स्वाध्याय देऊन तो पूर्ण करुन घेणे, मुलांनी आणलेला स्वाध्याय तपासून देणे ही कामे तत्परतेने शिक्षकांना करावी लागतील. ज्ञानरचनावाद, डिजिटल साहित्याचा अधिकाधिक वापर करावा लागेल. ऑनलाईन शिक्षणासारखी माध्यमे उपयोगात आणावी लागतील. स्वत:ला आवश्यक ऑनलाईन साहित्य तयार करावे लागेल किंवा उपलब्ध साहित्यामधून ते शोधावे लागेल.
शाळा सुरु करण्याची घाई का?
कोरोनाचा सर्वाधिक धोका ६० वर्षावरील वयोवृद्ध आणि १५ वर्षाआतील मुलांना आहे. सुदैवाने आपल्याकडील कोरोनातून बरे होण्याचा दर चांगला असला तरी मुलांना या धोक्यात जाणीवपूर्वक ढकलता येणार नाही. त्यामुळे सुविधा आणि सुरक्षितता पाहून व आवश्यक ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. शाळा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सल्ला घ्यावा लागेल. त्यांच्या परवानगीनेच गावातील शाळा सुरु कराव्यात. ज्या ठिकाणी १० वी आणि १२ वीचे वर्ग आहेत त्या ठिकाणचे हे वर्ग सर्वात आधी सुरु करावेत. त्यानंतर खाली खाली येऊन सर्वात शेवटी पहिला वर्ग सुरु करावा. १० वी आणि १२ वी चे वर्ग नसणाºया शाळा सुरु करण्याची अजिबात घाई करु नये.
वर उल्लेखिेलेले सर्व बदल शाळा पातळीवर केल्याशिवाय शाळा सुरु करता येणार नाहीत. काही सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना वेळ लागेल. अभ्यासक्रम, अध्ययन पद्धती, डिजिटल किंवा आॅनलाईन शिक्षण यात करावयाचे बदल शाळा आणि पालकांपर्यंत पोचवावे लागतील. यासाठी आवश्यक ती जाणीव जागृती करावी लागेल. क्वारंटाईन असलेल्या वर्गखोल्या रिकाम्या होईस्तोवर वाट पाहावी लागेल. त्यानंतर किमान आठ दिवस या खोल्या निजंर्तुकीकरण करुन तशाच राहू द्याव्या लागतील. वैद्यकीय अधिकारी यांनी खोल्या वापरायला हरकत नाही असे लेखी कळविल्याशिवाय त्या उपयोगात आणता येणार नाहीत. या सर्व बाबींची पूर्तता करायला वेळ लागेल. हा वेळ आपल्याला द्यावाच लागेल.
ऑनलाईन शिक्षण : समर्थन आणि विरोध
ऑनलाईन हा शिक्षण विभागात सध्या सर्वाधिक चचेर्चा विषय झाला आहे. ऑनलाईन शिक्षणाचे समर्थन आणि विरोधही होतो आहे. अर्ध्या मार्चपासून शाळा बंद झाल्याने मुलांचे शिक्षण थांबल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे या काळात बुडालेले शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून पूर्ण करुन घेण्याचे प्रयत्न काही संस्था आणि शाळांकडून केले जात आहेत. शहरी आणि खासगी शाळा ऑनलाईन शिक्षणात पुढे असल्या तरी त्यामागची कारणे वेगळी आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांकडे किमान मोबाईल तरी उपलब्ध असावा लागतो. त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल आणि इतर साधने उपलब्ध नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षणाला मुकावे लागत आहे.
-बालाजी देवर्जनकर
(लेखक नागपूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत)