नागपुरात सांड पकडताना पथकाची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 10:05 PM2019-10-03T22:05:36+5:302019-10-03T22:06:32+5:30
सांडांना पकडण्यासाठी तामिळनाडूच्या पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गुरुवारी पथकाने सक्करदरा, ताजबाग व दिघोरी परिसरातील पाच मोकाट सांडांना पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मोकाट सांडांना पकडण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने मोहीम हाती घेतली आहे. सांडांना पकडण्यासाठी तामिळनाडूच्या पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गुरुवारी पथकाने सक्करदरा, ताजबाग व दिघोरी परिसरातील पाच मोकाट सांडांना पकडले. ताजबाग परिसरातील सांडाला पकडताना तो बिथरल्याने परिसरातील लोकांना चांगलाच थरार बघायला मिळाला.
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास सांड पकडणारे पथक सक्करदरा परिसरात पोहचले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने सांड पकडण्याला सुरुवात केली. त्यानंतर ताजबाग, दिघोरी परिसरातील सांड जेरबंद करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मोकाट सांड पकडण्याची मोहीम सुरू आहे. बुधवारी मानकापूर भागातील मोकाट २२ जनावरे पकडली. यात सांडांचाही समावेश होता. कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोकाट गायी, म्हशींना पकडणे शक्य होते. परंतु सांडांना सहजासहजी पकडता येत नाही. सांड बिथरल्यास नुक सान होण्याचाही धोका असतो. याचा विचार करता तामिळनाडू येथील पथकाला शहरातील सांड पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. पथकात विशेष प्रशिक्षित १० लोकांचा समावेश आहे.
मोकाट जनावरे व सांड पकडण्याला गोपालकांचा विरोध होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेच्या संबंधित झोन क्षेत्रातील पोलीस स्टेशनकडे बंदोबस्ताची मागणी केली जाते. परंतु नवरात्रोत्सव व विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याला अडचणी येत आहे.
२०१३ मध्ये सांड पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी गोपालकांनी विरोध केल्याने मोहीम राबविणे शक्य झाले नव्हते. याचा विचार करता महापालिकेने यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले आहे. कोंडवाडा विभागाला गरजेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
नागपूर शहरात सुमारे २५० सांड आहेत. सांड पकडल्यास इतर जनावरांना नियंत्रण घालणे शक्य होईल. सांड पकडताना बिथरण्याची शक्यता गृहीत धरून या भागातील वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांचीही मदत आवश्यक आहे. पकडलेले सांड शहरापासून दूरवर असलेल्या गोरक्षण केंद्रात ठेवणार असल्याची माहिती पशुचिकि त्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.