महागाई कमी करण्यासाठी संघाने हस्तक्षेप करावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:04+5:302021-07-15T04:07:04+5:30
नागपूर : महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. त्यामुळे आता संघानेच महागाई कमी ...
नागपूर : महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. त्यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार घेत हस्तक्षेप करावा व केंद्राला सूचना करावी, यासाठीच आपण नागपुरात येऊन ही मागणी करीत आहोत. माझा आवाज संघाच्या कानांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे, असा टोला छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत लगावला.
अ.भा. काँग्रेस समितीतर्फे महागाईविरोधात देशभरात जनजागरण केले जात आहे. या अंतर्गत भूपेश बघेल यांनी नागपुरात येत केंद्र सरकारवर नेम साधला. बघेल म्हणाले, मोदी सरकारने गेली सात वर्षे हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद अशा भावनिक मुद्यांवर घालवले. जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच महागाईने उच्चांक गाठला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर २ ते ६ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तविली होती. मात्र, त्यापलीकडे महागाई गेली. पेट्रोल २६ टक्क्यांनी तर डिझेल ४२ टक्क्यांनी वाढले.
‘बहुत हुई महंगाई की मार’, असा नारा देत मोदी सरकार सत्तेत आले. पण, आता महागाई एवढी वाढली आहे की, ‘गद्दी छोडो मोदी सरकार’ असे जनता म्हणू लागली आहे. तत्पूर्वी विमानतळावर काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार आदींनी विमानतळावर बघेल यांचे स्वागत केले.
----------------
पेट्रोलियमला जीएसटीमध्ये आणणार
- केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे सांगत मोदी सरकारने इतर उत्पादनांवर चुकीच्या पद्धतीने जीएसटी आकारल्याचा आरोपही त्यांनी केला.
- भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, सीबीआय व आयटी या विभागांमार्फत धाडी घातल्या जातात. या तीनही एजन्सी भाजपच्या शाखा म्हणून काम करीत आहेत.
- तिसरे अपत्य असणाऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, हा योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेला निर्णय उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर डोळा ठेवून घेतलेला आहे. या कायद्याची छत्तीसगढमध्ये गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
------------
महाराजा व एअर इंडिया दोन्ही विकाऊ
- एअर इंडियाचा लोगो महाराजा आहे. हा महाराजा आता ज्योतिरादित्य सिंधिया यांना म्हणत आहे, ‘महाराज आईये हम दोनो बिकाऊ है, असा चिमटाही त्यांनी घेतला.