संघाचे टार्गेट पश्चिम बंगाल

By admin | Published: March 25, 2017 02:46 AM2017-03-25T02:46:06+5:302017-03-25T02:46:06+5:30

पश्चिम बंगाल राज्यात गेल्या काही वर्षापासून दहशतवाद्यांच्या हालचालीत वाढ झाली असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे.

Team Target West Bengal | संघाचे टार्गेट पश्चिम बंगाल

संघाचे टार्गेट पश्चिम बंगाल

Next

राज्यात जेहादी कारवाया वाढल्या : ममता सरकार मुस्लिम तुष्टीकरण करतेय
नागपूर : पश्चिम बंगाल राज्यात गेल्या काही वर्षापासून दहशतवाद्यांच्या हालचालीत वाढ झाली असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. राज्यातील विद्यमान ममता बॅनर्जी सरकार मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करीत असल्याच्या आरोपही केला आहे. नुकत्याच कोईम्बतूर येथे झालेल्या संघाच्या प्रतिनिधिक सभेत या कारवाया थांबविण्यात याव्या यासाठी प्रस्ताव पारित करून केंद्र आणि राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.
शुक्रवारी पत्रपरिषदेत दीपक तामशेट्टीवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात बंगालमध्ये कोलकातासह इतर भागात कट्टरपंथीयांकडून हिंसक घटनाक्रम होत आहेत. पश्चिम बंगाल दहशतवाद्यांचा गड म्हणून उदयास येत आहे. राष्ट्रीय चौकशी एजन्सी (एनआयए)ने याबाबत दुजोरा दिला आहे. राज्य सरकार मात्र मुस्लिम व्होटबँकेचे राजकारण करीत या हिंसक कारवायांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात मदरसासारख्या संस्थांना प्रोत्साहन दिले जाते व विद्याभारती शाळा बंद केल्या जात असल्याचा आरोप तामशेट्टीवार यांनी केला. प्रचार प्रमुख समीर गौतम, विदर्भ प्रचार प्रमुख अतुल पिंगळे, महानगर संघचालक राजेश लोया आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

पश्चिम विदर्भात जातीय भेदभाव
रा.स्व. संघातर्फे समरसता कार्यक्रमांतर्गत गावांमध्ये एका गावात एक पाणवठा, एक स्मशानभूमी असा जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत झालेल्या प्राथमिक पाहणीत विदर्भातील ४५० गावांमध्ये अशाप्रकार भेदभाव आढळून आल्याचे तामशेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यामध्ये पश्चिम विदर्भातील गावांचे प्रमाण अधिक होते. सध्या बुलडाणा जिल्ह्यात ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या पाच महिन्यात संघाच्या शाखांमध्ये पाच हजारांची वाढ झाली आहे. संघाद्वारे कोईम्बतूर येथील सभेनंतर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात संघाच्या ५७ हजार १८५ शाखा सुरू झाल्या असल्याची माहिती दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.
आॅक्टोबर २०१६ मध्ये ही संख्या ५२ हजार १०२ अशी होती. मागील वर्षी ग्रामस्तरावर झालेल्या प्रशिक्षण वर्गात २९१२७ शाखा प्रतिनिधी व १ लाख ४२५६ प्रशिक्षणार्थिंनी प्रशिक्षण घेतले. देशात संघाचे ५४९४५ मंडळ असून २२६०६ ठिकाणी संघ शाखा आहेत. यामध्ये संपर्कयुक्त शाखांची संख्या ८७९७ एवढी आहे. संघाच्या विविध संघटनांकडून देशभरात १ लाख ७०७०० प्रकारचे सेवाकार्य सुरू असल्याचे तामशेट्टीवार यांनी स्पष्ट केले. विदर्भात शाखांची संख्या स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भात ११४९ गावांमध्ये १८८० शाखा आहेत. देशात भाजपाची सत्ता असल्याने किंवा गणवेश बदलल्याने शाखा वाढल्याचा दावा त्यांनी यावेळी नाकारला.

 

Web Title: Team Target West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.