Maharashtra Election 2019; ‘इन्स्टाग्राम’वरही संघ राहणार सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 10:32 AM2019-10-07T10:32:20+5:302019-10-07T10:33:51+5:30
विविध माध्यमातून ‘ऑनलाईन’ माध्यमावर सक्रिय राहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता ‘इन्स्टाग्राम’वरदेखील आगमन झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदलत्या काळासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार-प्रसार धोरणातदेखील बदल होताना दिसून येत आहे. ‘ऑनलाईन’ माध्यमाचा संघाकडून मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू असून ‘सोशल मीडिया’वरदेखील नियमितपणे ‘अपडेट्स’ येत असतात. विविध माध्यमातून ‘ऑनलाईन’ माध्यमावर सक्रिय राहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता ‘इन्स्टाग्राम’वरदेखील आगमन झाले आहे. अधिकृतपणे संघाचे खाते उघडण्यात आले असून येथे संघाशी निगडित विविध कार्यक्रमांची छायाचित्रे ‘शेअर’ करण्यात येणार आहेत.
संघाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून संघाशी जुळण्याचे माध्यम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संघाचे अधिकृत ‘टिष्ट्वटर हँडल’ आहे. याशिवाय ‘फेसबुक’वरदेखील संघाचे अधिकृत ‘पेज’ आहे. तरुणाईमध्ये ‘इन्स्टाग्राम’चा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जगासह तरुण पिढीपर्यंत संघाचे उपक्रम पोहोचण्यासाठी हे खाते उघडण्यात आले आहे.
‘फेक अकाऊंट’ला बसणार आळा
संघाच्या नावे काही स्वयंसेवकांनी ‘इन्स्टाग्राम’वर खाते उघडले होते. शिवाय काही अतिउत्साही लोकांनी तर ‘फेक अकाऊंट’देखील उघडले होते. यामुळे नेटिझन्ससह सामाजिक वर्तुळात संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळेच ‘आर.एस.एस.ओआरजी_ऑफिशिअल’ या नावाने संघाचे अधिकृत ‘अकाऊंट’ सुरू करण्यात आले आहे. विजयादशमीच्या सोहळ्यादरम्यान या माध्यमातून सर्वात अगोदर छायाचित्र ‘शेअर’ करण्यात येणार आहेत.