रासायनिक खतांविरोधात संघ देशपातळीवर राबविणार मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:42+5:302021-03-25T04:09:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर पुढाकार घेण्यात येत आहे. याअंतर्गतच देशभरात रासायनिक खतांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर पुढाकार घेण्यात येत आहे. याअंतर्गतच देशभरात रासायनिक खतांच्या वापरासंदर्भात देशपातळीवर मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘भूमिसंपोषण’ या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येणार असून जैविक शेतीकडे ते वळावे यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पर्यावरण गतिविधी विभागामार्फत संघातर्फे विविध उपक्रम चालविण्यात येतात. याअंतर्गत ही मोहीम चालविण्यात येणार आहे. गुढीपाडव्यापासून या मोहिमेला देशभरात सुरुवात होणार असून गुरुपौर्णिमेपर्यंत जनजागृतीची मोहीम चालेल. याअंतर्गत संघ स्वयंसेवक व कृषितज्ज्ञ गावागावांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना रासायनिक खतांचे धोके, त्यामुळे जमिनीवर होणारा दुष्परिणाम, जैविक शेतीतील प्रयोग इत्यादींबाबत माहिती देतील. सोबतच वृक्षारोपण व प्लास्टिक हटाओ मोहीमदेखील राबविण्याचे निर्देश केंद्र पातळीवरून देण्यात आले आहेत. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील प्रस्तावांबाबत माहिती देण्यासाठी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी ही माहिती दिली. यावेळी विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे व महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम उपस्थित होते.
विदर्भात अपेक्षेपेक्षा जास्त निधी संकलन
राम मंदिरासाठी संघ परिवारातर्फे विदर्भातदेखील निधी संकलन करण्यात आले. विदर्भात २५ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे व ५० कोटींच्या निधी संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ४४ दिवसांत संघ स्वयंसेवक विदर्भातील १२ हजार ३१० गावांतील २७ लाख ६७ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचले व ५७ कोटींहून अधिक निधी गोळा केला. देशात संघ स्वयंसेवक ५ लाख ४५ हजार गावांत पोहोचले व १२ कोटी ४७ लाख कुटुंबांशी संपर्क झाला, अशी माहिती दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.