संघ देणार ‘आॅनलाईन’ बौद्धिक
By admin | Published: April 13, 2015 02:20 AM2015-04-13T02:20:36+5:302015-04-13T02:20:36+5:30
'दैनंदिन उपस्थितीमध्येच संघबळ दडले आहे', या डॉ. हेडगेवार यांच्या वक्तव्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधील
स्वयंसेवकांना मिळणार एका ‘क्लिक’वर मार्गदर्शन : ‘कंट्रीवाईड क्लासरूम’पासून प्रेरणा
योगेश पांडे ल्ल नागपूर
'दैनंदिन उपस्थितीमध्येच संघबळ दडले आहे', या डॉ. हेडगेवार यांच्या वक्तव्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधील बौद्धिकांमध्ये वारंवार आठवण करून दिली जाते. परंतु बदलत्या काळात संघदेखील कात टाकत असून तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांना जास्तीतजास्त प्रमाणात आकर्षित करण्यासाठी शाखांमधील बौद्धिक ‘आॅनलाईन’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा संघाचा मानस आहे. शिक्षणक्षेत्रातील ‘कंट्रीवाईड क्लासरूम’पासून याची प्रेरणा घेण्यात येत असून या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संघविचार पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आजच्या तारखेत तरुणाईमध्ये इंटरनेट हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. आजच्या युगातील तंत्रज्ञानाची शक्ती लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘हायटेक’ प्रणाली स्वीकारली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत संघ स्वयंसेवक पोहोचत आहेत. धकाधकीच्या जीवनामुळे तरुण शाखेत येऊ शकत नसले तरी त्यांना जोडून ठेवण्यासाठी संघाने ‘सोशल मीडिया’ची मदत घेतली आहे. संघाच्या संकेतस्थळावर जाऊन एका ‘क्लिक’वर स्वयंसेवक होण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात यामुळे शाखांची संख्या १८ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.परंतु नवीन पिढीपर्यंत संघविचार सखोल पद्धतीने पोहोचविण्यासाठी शाखापर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांसाठी शाखांमध्ये देण्यात येणारे ‘बौद्धिक’ स्वयंसेवकांना एका ‘क्लिक’वर उपलब्ध व्हावे असा विचार संघामध्ये जोर धरायला लागला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याला गंभीरतेने घेतले जेष्ठ पातळीवर यावर चर्चा सुरू आहे.
भविष्याचा विचार करणे आवश्यक
काळाची गरज लक्षात घेता तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक झाले आहे. संघविचार समाजात पोहोचविण्यासाठी ‘आॅनलाईन’ बौद्धिक उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याच्या सूचना सर्व स्तरांतून आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यानुसार लवकरच यासंदर्भात पावले उचलण्यात येतील व नजीकच्या भविष्यात ‘आॅनलाईन’ बौद्धिक जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे मत संघाचे अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख जे.नंदकुमार यांनी व्यक्त केले.