लोकार्पण कार्यक्रमात कार्यकर्त्याचे तरळले अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:22+5:302021-06-06T04:07:22+5:30
कार्यकर्ते हे नेत्यांना घडवीत असतात. आपले सर्कल आपल्या गावात विकासाची कामे व्हावीत, नेत्यांनी त्यासाठी थोडी सक्रियता दाखवावी हा प्रयत्न ...
कार्यकर्ते हे नेत्यांना घडवीत असतात. आपले सर्कल आपल्या गावात विकासाची कामे व्हावीत, नेत्यांनी त्यासाठी थोडी सक्रियता दाखवावी हा प्रयत्न असतो. आयुष्य निघून जाते नेत्यांच्या मागेपुढे राहण्यात, पण तो कार्यकर्ता जेव्हा ज्येष्ठ होतो, तेव्हा नेत्यांकडून जर उपेक्षा होत असेल तर त्याला सहन होत नाही. जिल्हा परिषदेचा एक सदस्य याच उपेक्षेचा बळी पडला. त्या सदस्याने कधीतरी आपल्याच लोकांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती, पण ही नाराजी त्या सदस्याच्याच जिव्हारी लागली. त्या सदस्याची तक्रार नेत्याकडे झाली, नेत्याकडून त्या सदस्याच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त झाली. शनिवारी सात रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या सदस्यापासून नेत्यांनीही अंतर बाळगले. नेत्यांकडून नव्यांना मान दिला जात असल्याचे बघून त्या सदस्याच्या भावना दाटून आल्या. कार्यकर्त्यांच्या गर्दीतून पाय मागे घेत, गाडीच्या मागे जाऊन एकांत बघून सदस्याने दाटलेल्या भावनांना अश्रू रूपाने वाट मोकळी करून दिली. कुणाचेही लक्ष जाणार नाही आणि चुकीचा संदेश पसरणार नाही, म्हणून लगेच अश्रू पुसत त्यांनी आपली नाराजी व्यक्त होऊ दिली नाही.