भावनांच्या सागरात अश्रू अन् आनंदाला भरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:42 AM2018-05-28T10:42:50+5:302018-05-28T10:43:00+5:30

वेळ सकाळी ८ वाजताची. नेहमीच रुक्ष वातावरण अनुभवणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहाचा परिसर आज काहीसा खुलला होता. रंगबिरंगी कपडे घालून आलेल्या चिमुकल्यांचा चिवचिवाट या परिसराला चैतन्याची पालवी देऊन गेला.

Tears and fills joy in the ocean of emotions | भावनांच्या सागरात अश्रू अन् आनंदाला भरते

भावनांच्या सागरात अश्रू अन् आनंदाला भरते

googlenewsNext

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेळ सकाळी ८ वाजताची. नेहमीच रुक्ष वातावरण अनुभवणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहाचा परिसर आज काहीसा खुलला होता. रंगबिरंगी कपडे घालून आलेल्या चिमुकल्यांचा चिवचिवाट या परिसराला चैतन्याची पालवी देऊन गेला. आप्तांच्या भेटीसाठी आसुसलेली, काही कावरीबावरी मनं मध्यवर्ती कारागृहाच्या प्रांगणात घातलेल्या शामियान्यात नावनोंदणी करीत होती. जसजसा घड्याळाचा काटा सरकत होता तसतशी उत्सुकता, लगबग अन् गर्दीही वाढत होती. अखेर शिटी वाजली. मध्यवर्ती कारागृहाचे भक्कम प्रवेशद्वारातील छोटे दार उघडले गेले अन् ८ ते १० जणांची छोटुकल्यांची पहिली तुकडी कारागृहाच्या आत सोडली गेली. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने लहानग्यांना त्यांच्या जन्मदात्याला भेटण्यासाठी आतमध्ये सोडण्याचा क्रम सुरू झाला.
कारागृहाच्या आतमध्ये घातलेल्या शामियान्यात ६ महिला आणि ७० पुरूष बंदी आपापल्या काळजाच्या तुकड्याची उत्कटपणे वाट बघत होते. ते नजरेस पडताच त्यांनी त्यांना उचलून छातीशी लावले. गुन्हेगार म्हणून कारागृहात डांबले गेलेल्यांच्या डोळ्यातून अश्रू आपसूकच ओघळू लागले. गळ्यात पडलेले चिमुकलेही आपल्या जन्मदात्याला, जन्मदात्रीला सोडायला तयार नव्हते.
बराच वेळ त्यांच्यात मूक संवाद सुरू होता. अखेर वेळेचे भान आल्याने जन्मदात्याने, जन्मदात्रीने आपल्या काळजाच्या तुकड्याला पुढ्यात घेतले अन् त्याला घरी गेल्यानंतर कसे वागायचे, कसे राहायचे, त्याचे धडे देणे सुरू केले.
शनिवारी, २६ मे रोजी मध्यवर्ती कारागृहात ‘गळाभेट’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना अनेकदा जामीन किंवा संचित रजा देखिल मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या आप्तांची, खास करून पोटच्या मुलांची भेट घेऊन त्यांचे ते कोडकौतुक करू शकत नाही. परिणामी हे कैदी कारागृहाच्या भेसूर भिंतीआड जगताना अनेकदा हिंसक होतात किंवा एकलकोंडे होऊन त्यांना वेगवेगळे आजारदेखिल जडतात. त्यांची ती अवस्था ध्यानात घेत कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘गळाभेट’ या अनोख्या उपक्रमाची कल्पना मांडली. त्यानुसार, वर्षातून दोनदा कारागृहात बंदिस्त दोषी कैद्यांच्या १६ वर्षेपर्यंतच्या मुलामुलींना आतमध्ये ३० मिनिटांची भेट घेऊ देण्यासाठी ‘गळाभेट’चे आयोजन होऊ लागले. हा अनोखा भावनिक उपक्रम कैद्यांच्या अन् त्यांच्या नातेवाईकांच्याच नव्हे तर
कारागृहाच्या रुक्ष परिसरालाही चैतन्याची झळाळी देणारा ठरला. चिमुकल्यांचा चिवचिवाट अन् पालकांची घालमेल वाढवणाºया या कार्यक्रमाने भावनांच्या सागरात अश्रू अन् आनंदाला भरते आल्याची अनुभूती संबंधितांना झाली.
‘गळाभेट’ कार्यक्रम २६ मे २०१८ ला होणार याची सिद्धदोष कैद्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आधीच माहिती देण्यात आली होती. त्यानुसार, सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १३५ कैद्यांनी नावे नोंदवली होती. त्यातील ६ महिला आणि ७० पुरूष कैद्यांच्या १४३ मुलामुलींनी आज गळाभेटसाठी धाव घेतली होती. कुणासोबत त्यांची आई, कुणासोबत वडील, मावशी, मामा, आजी, आजोबा अन्य दुसरे जवळचे नातेवाईक होते. आतमध्ये ते एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले. एकमेकांना खाऊ घातले. विचारपूस केली अन् सल्लामसलतही झाली.
तिची आणि त्यांचीही अवस्था शब्दातीत
महिला कैद्यांना भेटायला आलेल्या मुलांना आईशी काय बोलावे असा प्रश्न पडला होता तर एवढ्या कमी वेळात त्यांचा लाड कसा पुरवू असा पेच आईला पडलेला. मग काय दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात टाकून काहीबाही बोलत बसले. दोघांच्याही डोळ्यात आनंदाचे आणि विरहाचे अश्रू होते. दुसरा एक किस्साच वेगळा होता. सहा महिन्यांचे गोंडस बाळ घेऊन त्याचे वडील त्याच्या आईला भेट घालून देण्यासाठी पोहचले होते. ती चार महिन्यांपासून आतमध्ये होती. कधी एकदा आतमध्ये सोडतात, असे या बापलेकांना झाले होते. उत्सुकता टोकाला पोहचल्याने त्याने या चिमुकल्याला मध्यवर्ती कारागृहाच्या दाराच्या फटीतूनच त्याची जन्मदात्री दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने ते बापलेक आतमध्ये गेले. तब्बल चार महिन्यांनी आपल्या काळजाचा तुकडा बघून तिने त्याला मांडीवर घेत मायेची उब दिली. तिसरा प्रसंग वडिलांच्या बाबतीतला. त्याने त्याच्या चिमुकलीला जवळ घेऊन तिच्या केसातून हात फिरवत तिला गोंजारले. खाऊ भरवला. ते पाहून त्याच्या पत्नीने तोंडात पदर कोंबून आपल्या भावनांना रोखण्याचे प्रयत्न केले.
चौथा प्रसंग फारच भावनिक होता. वयात येऊ पाहणारी एक मुलगी आपल्या लहान भावांना सोबत घेऊन वडिलांच्या भेटीला पोहचली होती. तिला बºयापैकी समज आल्याने तिने डोळ्याला रुमाल लावत प्रश्न केला.... बाबा, कशाला तुम्ही हे सर्व केले? काळजाचा ठाव घेणारा हा प्रश्न केवळ तिच्या बाबांचीच नव्हे तर गळाभेटचे साक्षीदार असलेल्या अनेकांची घालमेल वाढविणारा ठरला.
अचानक शिटी वाजली आणि ताटातुटीच्या क्षणाची सर्वांना जाणीव झाली. मनावर दगड ठेवत कैद्यांनी आपल्या मुलांना जवळ घेऊन पुन्हा एकदा त्याचे लाड केले अन् निघाले आपल्या चार भिंतीआडच्या विश्वात. मुलांनीही त्यांना टाटा करत, हात हलवत निरोप दिला अन् आपल्या घराचा रस्ता धरला. ही सगळी दृश्ये कारागृहाच्या भेसूर भिंतींनी मूकपणे आपल्या उदरात साठवली. नंतर करड्या नजरेने पुन्हा पहारा देण्यासाठी त्या सज्ज झाल्या.
आम्हालाही सुखद अनुभूती : राणी भोसले
गळाभेटीच्या आजच्या उपक्रमात कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांची महत्वाची भूमिका होती. बाहेरगावाहून आलेल्या चिमुकल्यांसाठी आणि त्यांना घेऊन आलेल्या आप्तांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था कारागृह प्रशासनाने केली होती. या सोहळ्याबाबत भोसले यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आप्ताच्या भेटीनंतर कैद्यांच्या वर्तनात परिवर्तन होते. कुटुंबीयांना भेटून त्यांना समाधान आणि जो आनंद मिळतो त्यातून त्यांचे मानसिक स्थैर्य राखण्यास मदत होते. इथे त्यांच्या नशिबी एकांतवासच असतो. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात. चिडचिड करतात. कधी हिंसकही होतात. गळाभेटीमुळे केवळ त्यांनाच नव्हे आम्हालाही वेगळी सुखद अनुभूती मिळते.

Web Title: Tears and fills joy in the ocean of emotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग