कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:51 PM2018-12-13T22:51:59+5:302018-12-13T22:52:34+5:30
यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
१०० किलोमागे १२५ रुपये भाडे, दररोज २० ते २५ ट्रकची आवक
यावर्षी महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांदा मोफत वाटल्याचे आणि भाववाढीसाठी आंदोलन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण कांद्याचे उत्पादन मुबलक झाल्यामुळे त्यांना भाव मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कळमन्यात औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नाशिक या भागातून पांढरे आणि लाल कांदे विक्रीस येत आहेत. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे. त्यातच पांढऱ्या कांद्याची आवक कमी असल्यामुळे कळमन्यात भाव दर्जानुसार प्रति किलो ७ ते १२ रुपये आहेत. तसेच लाल कांद्याची आवक वाढली असून भाव ५ ते ९ रुपये आहेत. मोठ्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. खराब कांद्याला ३ ते ५ रुपये भाव आहे. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे.
भाडेखर्चामुळे नगर, औरंगाबाद, नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदे नागपुरात आणणे शक्य नाही. स्थानिक बाजारात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची ओरड आहे. मालवाहतुकीचा खर्च क्विंटलमागे १२५ रुपये येतो. नागपुरात प्रति क्विंटल ७०० रुपये भाव असलेल्या कांद्याला नगर, औरंगाबाद येथे ३०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. भाव हजार ते १५०० रुपये मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असे गुलवाडे यांनी स्पष्ट केले. ठोकमध्ये भाव कमी असतानाही किरकोळ बाजारात जास्त भावात विक्री होत आहे.
नागपुरात येताहेत जुने बटाटे
उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे नवीन पीक निघाले आहे. पण कोल्ड स्टोरेजमधील जुने बटाटे कळमन्यात विक्रीस येत आहे. भाव ६०० ते ८०० रुपये क्विंटल आहेत. तिन्ही राज्यातून कळमन्यात बटाटे आणण्यासाठी क्विंटलमागे २०० रुपये खर्च येतो. त्यामुळे बटाटे कळमन्यात आणणे शेतकऱ्यांना परवडत नाही. पण जास्त उत्पादनामुळे कळमन्यात आवक वाढली आहे.