देशातील तांत्रिक केंद्रे अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘लीज’वर द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:57 PM2020-12-17T12:57:12+5:302020-12-17T12:57:42+5:30
Nagpur News देशात आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक केंद्रे व संस्था आहेत. ही केंदे अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘लीज’वर देण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक केंद्रे व संस्था आहेत. या केंद्रातून दर्जेदार संशोधन अपेक्षित आहे. ही केंदे अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘लीज’वर देण्याची आवश्यकता आहे. असे झाले तर विद्यार्थी नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावू शकतील. शिवाय त्याचा उपयोग उत्पादन क्षेत्रासाठी व नवीन डिझाईनसाठी होईल. त्यामुळे देशातील उत्पादनाचा दर्जा वाढून ते आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धेत येऊ शकतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘गेम’तर्फे आयोजित ‘एमएसएमई’च्या आर्थिक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
नवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी, ग्रामीण, आदिवासी भागाचा कायापालट कसा करता येईल आणि अधिक रोजगार निर्मिती कशी होईल, यावर भर दिला गेला पाहिजे. यासाठी औद्योगिक व प्रामुख्याने अभियांत्रिकी क्षेत्राने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. शहरी भागातील उद्योगांचे विकेंद्रीकरण होऊन ते कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाकडे वळणे आवश्यक आहे. पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद या चार बाबीही उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक असून, ज्ञानाचे आणि कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करणे ही देशाची गरज आहे, असेदेखील गडकरी यावेळी म्हणाले.