नागपूर विद्यापीठाची पदवी ‘अपात्र’; औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ ‘पात्र’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:58 AM2023-01-23T10:58:44+5:302023-01-23T11:03:08+5:30
माहिती-जनसंपर्क विभागाच्या पदासाठी अर्ज भरताना तांत्रिक त्रुटी, विद्यार्थी हादरले
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत काढण्यात आलेल्या माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत विविध पदांकरिता उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यात येत आहे. परंतु अर्ज भरताना तांत्रिक त्रुटी येत असल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. खासकरून विदर्भातील विद्यापीठातील उमेदवारांचा अर्जच स्वीकारला जात नसल्याची ओरड असून, उमेदवारांकडून आयोगाकडे या त्रुटींसंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत.
नागपूर विद्यापीठातून जनसंवाद शाखेची पदव्युत्तर पदवी केलेल्या एका उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरला. या उमेदवाराने ज्या पदासाठी अर्ज भरलाय. त्यासाठी जनसंवाद शाखेची पदवी मागितली आहे. पण त्याने पदवी वाणिज्य शाखेतून व जनसंवाद शाखेतून पदव्युत्तर पदवी केली असतानाही अर्ज भरल्यानंतर पात्रच्या ठिकाणी अपात्र असे दाखवित आहे. काही उमेदवारांची ओरड आहे की, नागपूर, अमरावती व विदर्भातील अन्य विद्यापीठांतून पदवी व पदव्युत्तर पदवी केलेल्या उमेदवारांचा अर्जच स्वीकारला जात नाही.
जळगावातील किशोर बळीराम पाटील या उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या पद्धतीने अर्ज भरला. त्यात नेचर ऑफ जॉब या ठिकाणी सुपरव्हायझरी असे नमूद करावे, असे म्हटले होते. मात्र अर्ज भरताना नेचर ऑफ जॉब या कॅटेगिरीमध्ये सुपरव्हायझरी असे ऑप्शन दिसून येत नसल्याची त्यांची तक्रार आहे. पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी असतानाही अर्ज भरताना पात्रता तपासल्यानंतर त्या ठिकाणी अपात्र दाखवित आहे. त्यामुळे पात्र असूनही मला अर्ज भरता येत नाही, अशी त्यांची ओरड आहे.
अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ जानेवारीपर्यंत असल्याने एकच दिवस शिल्लक आहे. अर्ज जर वेळेत भरला गेला नाही तर शासकीय नोकरीची संधी जाऊ शकते, अशी खंत त्यांची आहे. त्यांनी आयोगाच्या सचिव व संचालकांना तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात, अशी मागणी केली आहे.