विदर्भात पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:24+5:302021-06-30T04:07:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी स्थापन करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या प्रकल्पासंदर्भातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी स्थापन करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या प्रकल्पासंदर्भातील तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्देश दिले असून, तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रधान यांची भेट घेतली.
वेद (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) या संस्थेतर्फे विदर्भात पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वेदच्या या प्रयत्नांना सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील पाठबळ दिले आहे. धर्मेंद्र प्रधान यांना पाठविलेल्या पत्रांमध्ये नेत्यांनी विदर्भावर आतापर्यंत झालेला अन्याय, विदर्भातील क्षमता, प्रकल्प स्थापन झाल्यावर होणारे फायदे, इत्यादी मुद्दे सविस्तरपणे मांडले आहेत. वेदने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी सर्वांनी मागणी केली होती.
या प्रकल्पाच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी केंद्रीयमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी खासदार अशोक नेते, पेट्रोलियम सचिव तरुण कपूर व वेदचे पदाधिकारी प्रदीप माहेश्वरी, विनायक मराठे, शिवकुमार राव, नवीन मालेवार हेदेखील उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांच्यासमोर सखोल सादरीकरण करण्यात आले. सादरीकरण पाहिल्यानंतर केंद्रीयमंत्र्यांनी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले.
प्रकल्प विदर्भासाठी फायदेशीर ठरेल
केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासंदर्भातील निर्देश अधिकार्यांना दिले, यासाठी मी त्यांचा अतिशय आभारी आहे. नागपुरात प्रकल्प स्थापन होईल, असा मला विश्वास आहे. या प्रकल्पामुळे विदर्भात उद्योग स्थापनेला पाठबळ मिळेल. गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठी सुद्धा त्यामुळे मोठी मदत होईल. शिवाय नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्याने येथून देशाच्या कुठल्याही भागात सहजतेने पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
रिफायनरीमुळे विदर्भाचा फायदा
- मध्य भारतातील सिमेंट कंपन्यांसह इतर उद्योगक्षेत्रांना कमी दरात पेट्रोलियम पदार्थ मिळतील.
- या प्रकल्पामुळे हिंगणा, बुटीबोरी व मिहान या औद्योगिक भागासह मध्य भारतातील उद्योगक्षेत्राचा विकास होईल.
- विदर्भात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाच लाख रोजगारांची निर्मिती होईल.
- नागपुरातील प्रकल्पातून विदर्भाचे औद्योगिक मागासलेपण निश्चितपणे दूर होईल.
- विदर्भातून देशाच्या सर्व भागांतील निर्यात वाढेल.