‘कॅशलेस’च्या साक्षरतेसाठी धडपडणारा ‘टेक्नोक्रॅट’
By admin | Published: February 9, 2017 02:39 AM2017-02-09T02:39:44+5:302017-02-09T02:39:44+5:30
मोबाईल क्रांतीकडे वाटचाल करणाऱ्या भारतात डिजिटलची ओढ लागली होती. मात्र पंतप्रधानाच्या नोटाबंदीच्या
अजित पारसेंनी चालविले अभियान : वस्त्यांमध्ये फिरून देतोय प्रशिक्षण
निशांत वानखेडे नागपूर
मोबाईल क्रांतीकडे वाटचाल करणाऱ्या भारतात डिजिटलची ओढ लागली होती. मात्र पंतप्रधानाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अचानक कॅशलेस व्यवहाराचा नारा दिल्याने धावपळ उडाली आहे. नुसते आवाहन करून जाहिराती सुरू आहेत. प्रशिक्षण आणि पुरेशा माहितीअभावी नागरिकांची तारांबळ उडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत नागपूरच्या तरुण व्यावसायिकाने कॅशलेस म्हणजे ई-व्यवहाराच्या साक्षरतेचे अभियानच हाती घेतले आहे. विशेषत: गरीब वस्त्यात जाऊन हा तरुण लोकांना नि:शुल्क रोकडरहीत व्यवहाराचे प्रशिक्षण देत आहे. भविष्याचा वेध घेणाऱ्या या व्यक्तीचे नाव अजित पारसे.
स्वावलंबीनगर येथे राहणारे अजित पारसे व्यवसायाने सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत. या व्यवसायात असल्याने तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांना माहीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना सामाजिक जाण आहे. त्यामुळे काही वर्षापासून गरीब वस्त्या व झोपडपट्ट््यांमध्ये ‘ई-साक्षरतेचे’ अभियान चालविले आहे. त्या अभियानाला पारसे यांनी कॅशलेस व्यवहाराच्या प्रशिक्षणाची नवी कडी जोडली आहे.
देशात ८५ टक्के व्यवहार रोखीने चालत आहेत. कॅशलेसचे व्यवहार गेल्या काही वर्षात सुरू झाले असले तरी त्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोकडरहीत व्यवहार अंगिकारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याबाबत माहितीच्या अभावामुळे लोकांना अडचणच सहन करावी लागत आहे. उच्चभ्रू वर्गामध्ये हा प्रश्न नसला तरी ही मध्यमवर्ग व त्याहीपेक्षा गरीब, मोलमजुरी करणाऱ्यांना यामुळे समस्यांना सामोरे जावे लागते. लोकांची ही अडचण लक्षात घेत अजित पारसे यांनी स्वत:च प्रेरणेने कॅशलेस प्रशिक्षणाचे अभियान सुरू केले. यासाठी कुठल्या पक्षाची किंवा शासकीय योजनांचीही मदत घेतली नाही. यासाठी त्यांनी स्वत:च व्हॅन विकत घेतली व त्यात प्रशिक्षणासाठी आवश्यक तंत्रज्ञान बसवून घेतले. कॅशलेस व्यवहाराचे फायदे व वापरण्याची माहिती कष्टकरी, वंचितांना देण्यासाठी अजित पारसे प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते स्वत: दररोज शहरातील कुठल्या ना कुठल्या झोपडीपटट्ी, मजूर ठिय्या, महिला बचत गट, सामाजिक संस्था, अनाथालय, दिव्यांग संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन संगणक रोकडरहीत व्यवहार वापराचे नि:शुल्क मार्गदर्शन करतात. यामध्ये त्यांच्यासमवेत काही सहकारीही जुळले आहेत. गरीब महिला, मजूर दिसले की त्यांना माहिती देतात. त्यांनी भाजीविक्रेते, आॅटोचालक, पानठेलेचालक कॅशलेसबाबत जागरूक करून दुकानांवर त्याचे तंत्रज्ञान लावण्यासाठी प्रोत्साहित केले व व्यवहार बँकेशी जोडण्यास मदत केली. अनेकांना स्वत: स्वाईप मशीन आणून दिली.
एखाद्या वस्तीमध्ये माहिती देताना काही हुशार तरुण दिसले की, त्यांना स्वत:च्या कार्यालयात आणून नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी चालविले आहे. या कार्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विरल कामदार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील टेक्नोसॅव्ही लोकांनी व शासकीय यंत्रणांनी लोकांच्या प्रशिक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘आधार’बेस व्यवहार सर्वांसाठी सोयीचे
कॅशलेस व्यवहारासाठी अनेक कंपन्या बाजारात आहेत. काही वर्षांअगोदर सरकारने रुपी कार्ड सुरू केले होते. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड आहेतच. मात्र काही नव्या कंपन्या लोकप्रिय ठरत आहेत. यामध्ये आपल्या आधार कार्डच्या मदतीने होणारे व्यवहार अधिक चांगले असल्याचे अजित पारसे यांनी सांगितले. विशेषत: गरीबस्तरातील आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणारा आहे. मोठे दुकानदारच नाही तर भाजीविक्रेते, आॅटोचालक, पानविक्रेतेही कॅशलेस व्यवहाराचे विविध तंत्रज्ञान सहज वापरू शकतात.
धोकादायक काहीच नाही
कॅशलेस व्यवहारात उतरलेल्या बोगस कंपन्याही बाजारात आहेत. मात्र त्या फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे कॅशलेस व्यवहार धोकादायक नसून लाभदायकच ठरणारे आहे. मात्र लोकांनी पिन नंबर, पेटीएम नंबर किंवा कोणताही गोपनीय क्रमांक शेअर न करण्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.