नागपुरात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:25 AM2019-09-27T00:25:02+5:302019-09-27T00:25:49+5:30
परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य आल्याने तंत्रनिकेतन (पालिटेक्निक) च्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पारडीतील उपरे मोहल्ल्यात घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य आल्याने तंत्रनिकेतन (पालिटेक्निक) च्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पारडीतील उपरे मोहल्ल्यात घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोमल कैलाश चहांदे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती केडीके कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षाला शिकत होती. परिसरातील चर्चेनुसार, काही दिवसांपासून कोमल तासन्तास मोबाईलमध्ये गुंतून राहायची. त्यामुळे तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी ती तीन विषयात अनुत्तीर्ण झाली होती. यामुळे तिला नैराश्य आले होते. ती अलिकडे सारखी नाराज राहायची. मोबाईल अन् ती एवढेच तिचे विश्व झाले होते. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोमल तिच्या घराच्या टेरेसवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली आली नाही. त्यामुळे खालच्या रूममध्ये असलेल्या आईने कोमलच्या मोठ्या बहिणीला काजलला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास टेरेसवर पाठविले. यावेळी कोमल तिला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. काजलने आरडाओरड केल्यामुळे तिची आई धावत आली. शेजारीही गोळा झाले. त्यांनी कोमलच्या गळ्यातील फास काढला. तिला खाली नेण्यात आले. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी तिच्यावर प्रथमोपचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, कोमल निपचित पडून असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे एकाने पारडी पोलिसांना माहिती कळविली. ठाणेदार सुनील चव्हाण यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. कोमलची आई आणि बहीण काजल यांनी दिलेल्या माहितीवरून पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परीक्षेत आलेल्या अपयशामुळे नैराश्य येऊन कोमलने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे ठाणेदार चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, खरे कारण शोधण्यासाठी सर्व बाजू तपासल्या जात असल्याचेही चव्हाण म्हणाले.
पबजीने केला घात ?
कोमलला पबजी खेळण्याची सवय लागली होती. ती तासन्तास पबजीत गुंतून राहायची. त्यामुळे तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले अन् त्याचमुळे तिला नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, असे काहीही प्राथमिक तपासात पुढे आले नाही, असे पारडीचे पोलीस सांगतात.