नागपुरातून केले अमेरिकेत वास्तुपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:13 AM2018-05-15T10:13:36+5:302018-05-15T10:13:46+5:30
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय दाम्पत्याने वास्तूचे पूजन भारतीय संस्कृतीनुसार केले. या पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित हे भारतात होते आणि विधी अमेरिकेत पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय लोक कुठेही गेले तरी आपल्या संस्कृतीला विसरत नाही. याची प्रचिती अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय दाम्पत्याने आणून दिली. त्यांनी अमेरिकेत घेतलेल्या वास्तूचे पूजन भारतीय संस्कृतीनुसार केले. या पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित हे भारतात होते आणि विधी अमेरिकेत पार पडले. अगदी भारतीय पद्धतीने पार पडलेले हे वास्तुपूजन साध्य झाले केवळ तंत्रज्ञानामुळे.
नरेंद्रनगर येथील रहिवासी नंदकिशोर भालेकर यांचा मुलगा श्रीधर व सून सोनम भालेकर हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. हे दोघेही अॅपल मोबाईल कपंनीत स्वॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांनी अमेरिकेतील ‘सेन होजे’ येथे घर घेतले. घराचे वास्तुपूजन हे भारतीय संस्कृतीनुसार करण्याचे त्यांनी ठरविले. त्यांनी पंचांगानुसार तिथी काढली व वास्तुपूजनाचा कार्यक्रम निश्चित केला. स्थानिक बाजारपेठेतून वास्तुपूजनासाठी लागणारे साहित्य आणले.
परंतु पूजा कोण करेल, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यामुळे त्यांनी आॅनलाईन पूजा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता पं. अनंत जोशी यांनी वास्तुपूजनाला सुरुवात केली व रात्री १२ वाजता पूजा संपविली.
पौरोहित्य करणारे जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पूजाविधी सांगत मंत्रोच्चार करीत होते.
पं. अनंत जोशी यांनी नंदकिशोर भालेकर यांच्या नरेंद्रनगर येथील घरातून पूजाविधी सांगितली. पूजन संपल्यानंतर पती-पत्नी दोघांनीही पुरोहितांचे आॅनलाईन आशीर्वाद घेतले.