तंत्रज्ञान लघुउद्योगापर्यंत पोहचावे

By admin | Published: February 6, 2016 03:06 AM2016-02-06T03:06:43+5:302016-02-06T03:06:43+5:30

एखादे नवे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित करणे एकवेळ सोपे होईल, मात्र ते तंत्रज्ञान उद्योगापर्यंत पोहचविणे आणि व्यावसायिक उपयोगात आणणे २० पटीने कठीण असते.

Technology reach the small scale industry | तंत्रज्ञान लघुउद्योगापर्यंत पोहचावे

तंत्रज्ञान लघुउद्योगापर्यंत पोहचावे

Next

अनिल काकोडकर : ‘व्हीएनआयटी’त आयफा परिषदेचे उद््घाटन
नागपूर : एखादे नवे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित करणे एकवेळ सोपे होईल, मात्र ते तंत्रज्ञान उद्योगापर्यंत पोहचविणे आणि व्यावसायिक उपयोगात आणणे २० पटीने कठीण असते. दुसरीकडे नवे तंत्रज्ञान लघुउद्योगापर्यंत पोहचत नसल्याने हे उद्योग स्पर्धेमध्ये मागे पडत जातात. त्यामुळे प्रयोगशाळेत विकसित झालेले तंत्रज्ञान लघुउद्योगापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी), विज्ञान भारती आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) यांच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रीज, इनोव्हेशन, एन्टरप्रीनर, फॅसिलिटेटर अँड अ‍ॅकेडमिया (आयफा) कॉन्फरन्स २०१६ च्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. सारस्वत, टी. करुणाकरन, व्हीएनआयटीचे चेअरमेन विश्राम जामदार, विज्ञान भारतीचे जयंत सहस्रबुद्धे, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, नरेंद्र चौधरी, पी.पी. जोशी, श्रीराम जोतिषी, परिषदेचे संयोजक संजय वटे, एम.के. तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. काकोडकर यांनी लघुउद्योजकांच्या अडचणी सांगून उद्योग धोरणाबाबत शंका उपस्थित केली. तंत्रज्ञान हे नेहमी बदलत राहते. उद्योजकांना जुन्या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्पर्धेत टिकणे शक्य होणार नाही. त्यामुळे नवनवे तंत्र लघुउद्योगापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. दुसरीकडे आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्यापलीकडे काम करण्याची आपण इच्छा करीत नाही. अभियांत्रिकीचे विद्यार्थी किंवा प्रशिक्षकही आपल्या क्षेत्राशिवाय इतरत्र काम करीत नाही.
उद्योजकांची स्थितीही याहून वेगळी नाही. ही संस्कृती चुकीची आहे. त्यापेक्षा उद्योगांमधील अनेक लहान समस्या अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि शिक्षक सहज सोडवू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात करावे लागणारे प्रोजेक्ट त्यांनी अशा लघुउद्योगांमध्ये करावे, जेणेकरून उद्योजकांसमोर येणाऱ्या लहानमोठ्या समस्या सोडविण्यास मदत होईल. त्यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)

स्मार्ट शहराऐवजी स्मार्ट खेडी
विकसित करा : करुणाकरन
देशातील शहरे आधीच लोकसंख्येने फुगली असून खेड्यातून लोक पलायन करीत आहेत. त्यामुळे पुन्हा शहरे विकसित करण्याचे धोरण न समजणारे आहे. त्यापेक्षा खेड्यांचा विकास करण्याची आज गरज आहे, असा सल्ला चित्रकूट आणि गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाचे माजी कुलगुरू टी. करुणाकरन यांनी आयफा परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी दिला. आयफाच्या उद््घाटन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून बोलताना करुणाकरन यांनी लघुउद्योगाच्या माध्यमातून ग्रामविकास करण्याचे विलेज मायक्रो इंडस्ट्रिज कॉम्प्लेक्स मॉडेलचे सादरीकरण केले. शहरात उद्योगांना लागणारा कच्चा माल गावातून येतो. मनुष्यबळही ग्रामीण भागातीलच आहे. यांचा उपयोग गावातही केला जाऊ शकतो. सोलर चरखा उद्योगाचे उदाहरण देत लहान लहान उद्योग खेड्यांमध्ये लावणे सहज शक्य असल्याचे ते म्हणाले. यासाठी केवळ गावात तंत्रज्ञानाची कनेक्टीविटी वाढविणे आवश्यक आहे. इंटरनेट, इलेक्ट्रीसिटी, रोड याचे नेटवर्क वाढवून खेडी स्वयंपूर्ण करण्याची गरज आहे. खेडी ही मार्के ट प्लेस झाले पाहिजेत. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करुणाकरन यांनी गावात लघुउद्योग विकासाचा आराखडा समोर ठेवला. गावात छोटे छोटे उद्योग एकसमूहात स्थापन करावे आणि येथे उच्च सुविधा पुरवाव्यात. यामुळे खेड्यातील ९० टक्के समस्या सहज सुटतील असा दावा करुणाकरन यांनी केला.

चीनमध्ये ३००, भारतात एकच संशोधन पार्क
आपल्या देशात तंत्रज्ञान आणि संशोधन सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यात आम्ही कमी पडतो. ज्ञानाचे युग असून भारतात बौद्धिक क्षमता बरीच आहे. मात्र संशोधनाचे पुरेसे साधन नाही. चीनमध्ये ३०० संशोधन पार्क आहेत, मात्र भारतात केवळ एकमेव संशोधन पार्क चेन्नईमध्ये असल्याचे काकोडकर यांनी आवर्जून नमूद केले.

२०२० पर्यंत एरोस्पेस उद्योगात भारत
तिसऱ्या स्थानावर : व्ही.के. सारस्वत
राष्ट्रीय नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत यांनी, एरोस्पेस इंडस्ट्रीजमध्ये भारत २०२० पर्यंत अमेरिका आणि चीननंतर जगात तिसऱ्या स्थानावर राहील, असा दावा केला. आयफा परिषदेच्या उद््घाटन प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना सारस्वत यांनी एरोस्पेस उद्योगाची गुंतवणूक १५० बिलियन डॉलर पर्यंत जाईल असे सांगितले. या क्षेत्रामध्ये लघुउद्योगांना अनेक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सरकारच्या ‘मेक इन इंडियाच्या’ प्राधान्यक्रमात कृषि क्षेत्र, आरोग्य उद्योग, स्मार्टसिटी, डिजिटल इंडिया यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सारस्वत यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सरकारचे व्हिजन २०२० सादर केले. देशाच्या आर्थिक विकासामध्ये लघुउद्योगांचा वाटा सर्वात मोठा असल्याचे सांगत लघु उद्योगांना प्रत्येक क्षेत्रात अनेक संधी असल्याचे ते म्हणाले. कृषिक्षेत्र, आरोग्य उद्योग, रेल्वे, विमान उद्योग, संरक्षणाचे क्षेत्र, वॉटर इन्फ्रास्ट्रकचर, टेलिकॉम सेक्टर, या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या असंख्य संधी आहेत. लहान उद्योजकांनी या क्षेत्रामध्ये काम करावे, असे आवाहन सारस्वत यांनी केले. या क्षेत्रामधील कोणते उद्योग लाभदायक ठरतील याचे सादरीकरण त्यांनी केले. देशाला इंटेलिजंट राष्ट्र बनविण्यासाठी स्मार्टसिटीची आवश्यकता असल्याचे सांगत २०२० पर्यंत १०० शहरांना स्मार्ट सिटीसारखे विकसित करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्मार्ट शहरे खेड्याकडून पलायन करण्यासाठी नाही तर लहान शहरांपर्यंत स्मार्ट शहरांच्या सुविधा पोहचविण्याचे लक्ष्य असल्याचा दावा त्यांनी केला.

तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण आवश्यक
देशातील ७० टक्के जनता खेड्यात राहते. मात्र खेड्यापर्यंत तंत्रज्ञान पोहचत नसल्याने तेथील विकास झाला नाही. लघुउद्योगासाठी अधिक जागा किंवा जास्त भांडवलाची गरज नाही. ते शहराप्रमाणे खेड्यातही सुरू करता येतात. त्यामुळे लघुउद्योगांना खेड्यातही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ तंत्रज्ञानाची आणि रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढविणे गरजेचे आहे. तसे झाले तर शेतकरी आत्महत्येची समस्या सोडविता येईल, असे स्पष्ट मत अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Technology reach the small scale industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.