तंत्रज्ञानाचा अतिरेक घातक
By Admin | Published: September 27, 2015 02:43 AM2015-09-27T02:43:12+5:302015-09-27T02:43:12+5:30
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे.
सिद्धार्थविनायक काणे : नीरी येथे सीएसआयआरचा स्थापना दिवस
नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. त्यामुळे मानव उपयोगी नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी वैज्ञानिक झटत आहेत. मात्र दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर नियंत्रण मिळविण्यासाठी समानांतर संशोधन करावे लागत आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच ठरतो, तसेच तंत्रज्ञान वापराचेही होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना संवेदनशीलता बाळगण्याची वेळ आता आली आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था(नीरी) येथे शनिवारी कौन्सिल आॅफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च(सीएसआयआर)चा ७३ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. स्थापना दिनाच्या कार्यक्रमात डॉ. काणे बोलत होते.
याप्रसंगी नीरीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. तपस नंदी, संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. काणे पुढे म्हणाले, निसर्गात दडलेल्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. हे संशोधन पुढे विज्ञानाच्या रूपात समोर येते व त्याचा मानवी वापर हे तंत्रज्ञान ठरते.
गेल्या काही दशकापासून तंत्रज्ञानाचा कल्याणकारी उपयोग मागे पडत असून, दुष्परिणाम वाढले आहेत. काही विघातक मनोवृत्तीतून मानवसृष्टीला नष्ट करणारी अणुहत्यारे निर्माण केली जात आहेत. निसर्गाच्या नियमाला डावलून तंत्रज्ञानाचा उपयोग झाला, तर तो धोकादायक ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
येथे उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संबोधित करताना डॉ. काणे यांनी शाळेत ग्राहक आणि सेवा पुरविणारा अशा नात्याऐवजी पुन्हा गुरु-शिष्याचे नाते निर्माण करा, असे आवाहन केले. यावेळी बोलतांना डॉ. तपस नंदी यांनी सीएसआयआरने संशोधनात मोठी भरारी घेतल्याचे सांगितले.
मात्र हे संशोधन सामान्य लोकांपर्यंत आणि अधिकाधिक उद्योग क्षेत्रापर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. समारंभाच्या वेळी संस्थेत २५ वर्षे सेवा देणाऱ्या, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि गुणवत्ता यादीत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्थापना दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट विज्ञान प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. संचालन स्नेहल देशमुख यांनी केले. डॉ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)