दिल्ली-आग्रा येथील तरुणी सापडल्या : ‘संबंधा’ला विरोध झाल्याने पळून आल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:05 AM2019-07-10T00:05:24+5:302019-07-10T00:07:06+5:30
‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
या तिघींचे वय २०, २२ आणि २५ वर्षे आहे. त्यातील २२ आणि २५ वर्षे वयाच्या तरुणी सख्ख्या मावसबहिणी आहेत. त्यांची आणि २० वर्षीय तरुणीची काही वर्षांपूर्वी शिकत असताना ओळख झाली, नंतर २० आणि २५ वयाच्या तरुणीमध्ये घट्ट नाते निर्माण झाले. त्या दोघी एकत्र राहू लागल्या. खाणे, पिणे, उठणे, बसणे, फिरायला जाणे, असे सर्वच त्यांचे एकत्र होते. त्यांच्यातील ‘संबंधा’ची घरच्यांना कल्पना येताच घरच्यांनी २५ वर्षीय तरुणीचे लग्न लावून दिले. मात्र, ती पतीसोबत जास्त दिवस राहू शकली नाही. ती आपल्या जीवलग सखीकडे परतली. तिने पतीला आपल्या संबंधाची कल्पना दिली. त्यामुळे पतीनेही तिला जवळ करण्याचे टाळले. दरम्यान, रूम पार्टनर म्हणून राहणाऱ्या या दोघी लाईफ पार्टनरसारख्या राहत असल्याने दोघींच्याही नातेवाईकांनी त्यांना तीव्र विरोध केला. सारखे वेगळे करण्याचे प्रयत्न होत असल्याने २८ जूनला त्यांनी दिल्लीतून पळ काढला. या दोघींसोबत २२ वर्षीय तरुणीही निघाली. त्या तिघी नागपुरात पळून आल्या. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहननगरात त्यांनी एका गर्ल्स होस्टेलमध्ये आश्रय घेतला. आम्हाला येथे नोकरी करण्यासोबतच बीपीएड करायचे आहे, असे सांगून त्यांनी होस्टेलमध्ये प्रवेश मिळवला होता. दरम्यान, एकसाथ तिघी तरुणी बेपत्ता झाल्याने एकीच्या पालकाने आग्रा येथे तर दोघींच्या पालकांनी २८ जूनला दिल्लीत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांची शोधाशोध केली. तरुणींचे कॉल लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बेपत्ता तरुणींचा शोध लावण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
व्यक्तिस्वातंत्र्याची विचारणा
मंगळवारी सकाळी तरुणींचे पालक सदर पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी मोहननगरातील होस्टेल शोधून काढत तिघींना ताब्यात घेतले. त्यांना ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी तरुणींनी पालकांसोबत पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली. आम्ही सज्ञान आहोत. या देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.