किशोरीतार्इंनी गाण्यात भावना ओतली

By admin | Published: April 11, 2017 02:23 AM2017-04-11T02:23:10+5:302017-04-11T02:23:10+5:30

संगीतातील लय आणि ताल तोलून-मापून वापरणे हे जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य आहे. अभिजात कलांमध्ये भावनेत वाहून जाण्याला मनाई आहे.

Teenagers poured their feelings into singing | किशोरीतार्इंनी गाण्यात भावना ओतली

किशोरीतार्इंनी गाण्यात भावना ओतली

Next

महेश एलकुंचवार : स्वरार्थमणी दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण
नागपूर : संगीतातील लय आणि ताल तोलून-मापून वापरणे हे जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य आहे. अभिजात कलांमध्ये भावनेत वाहून जाण्याला मनाई आहे. ती कला बुद्धिप्रामाण्य असण्यावरच अनेकांचा भर असतो. मात्र किशोरीतार्इंनी जुन्या संकल्पना मोडित काढून गाण्यांमध्ये भावना आणली. भावना म्हणजे कळ काढणे किंवा रडणे नाही तर रागांचा अंत:स्वभाव समजणे होय. किशोरीतार्इंनी आयुष्यभर हा प्रयत्न केला. ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार महेश एलकुंचवार यांनी एका कार्यक्रमात हे मनोगत व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विदर्भ प्रांताच्यावतीने गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे जीवन व योगदान यावर आधारित ‘स्वरार्थमणी’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण राष्ट्रभाषा संकुलच्या धनवटे सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी महेश एलकुंचवार यांनी किशोरीतार्इंविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्या मूर्तिमंत देवस्वरूप होत्या. पु. ल. देशपांडे यांनी एकदा किशोरीतार्इंना बंडखोर म्हणून संबोधले होते. तेव्हापासून महाराष्ट्रात त्यांच्याविषयी त्याच भावनेतून विचार केला गेला. किशोरीतार्इंना बंडखोर समजणे योग्य नाही. त्यांनी जयपूर घराण्याची तालीम सोडली नाही, किंबहुना संगीताची परंपरा अधिकच समृद्ध केली. त्यांच्या गाण्यांचे खोलवर जाऊन विश्लेषण करणे आवश्यक आहे, मात्र तसा श्रोता आता राहिला नाही. कलावंत कितीही अभिजात असला तरी त्याची कला समजणारे श्रोतेही तेवढेच समजदार असले पाहिजेत. आपले गाणे समजणारे किती, ही खंत किशोरीतार्इंनीच व्यक्त केली होती.
त्यामुळे त्यांच्या गाण्याचे स्वरूप समजून घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना एलकुंचवार यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. चित्रा मोडक म्हणाल्या, किशोरीतार्इंनी रियाज, चिंतन, मनन व कल्पकतेचे सातत्य राखले. त्यांच्या गाण्यात गहनता, अलौकिकता होती. त्यांनी अंतर्मुख करणारे आणि आत्मानंदासाठी गाणे सादर केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आशाताई बगे यांनी किशोरीतार्इंचे गाणे आकाराकडून निराकाराकडे नेणारे असल्याचे सांगितले. खोकर, बहादुरी तोडी, यमन, सावनी असे कितीतरी राग ऐकताना आकाश कमी पडेल अशी अवस्था होते. त्यांनी एका कलावंताची अप्रतिम आर्तता व अस्वस्थता दिली आणि सोबतच सृजनाचा आनंद आमच्या व पुढच्या पिढीला दिला. गाण जसं त्यांच्या हातात होते तसा मृत्यूही त्यांच्या हातात होता व त्यांनीच मृत्यूला स्वत:चा देह दिला, अशी भावना आशाताई यांनी व्यक्त केली.
यावेळी पडद्यावर किशोरीतार्इंच्या काही मुलाखती व आठवणीतील गाणी ऐकविण्यात आली. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध गायिका साधना शिलेदार यांची होती. त्यांनी किशोरीतार्इंनी गायिलेली काही आठवणीतील सुमधूर गाणी यावेळी सादर करून श्रोत्यांना भावविभोर केले. राग रागेश्री, पंचम, बहादूर तोडीतील गाणी आलापात सादर करीत साधना शिलेदार यांनी किशोरीतार्इंच्या आठवणी जाग्या केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी तर माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Teenagers poured their feelings into singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.